‘इंग्लिश विंग्लिश’च्या यशानंतर दिग्दर्शिका गौरी शिंदे हिच्या आगामी चित्रपटात अभिनेता शाहरुख खान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. शाहरूख खान या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असल्याची चर्चा होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. तो प्रमुख भूमिका साकारणार नाही.
रेड चिलीज आणि धर्मा प्रॉडक्शन एकत्रित मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात तीन प्रमुख नायक असतील. त्यापैकी एक नायक हा दाक्षिणात्य चित्रपटांमधील अभिनेता आहे. चित्रपटातील नायकांची नावे बाहेर येऊ नयेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे, असेही या सूत्राने सांगितले.
गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ प्रेक्षकांनी मोठी दाद दिली होती. अनेकांनी हा चित्रपट आवर्जुन पाहिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गौरी शिंदेच हा चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे अनेकांना उत्सुकता आहे.