नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. ‘राहुल’ असो किंवा ‘राज’. प्रत्येक रुपात शाहरुखने प्रेमाची नवी समीकरणं उलगडत चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं. त्यामुळे शाहरुखचा फॅनफॉलोअर्स कमालीचा असल्याचं पाहायला मिळतं.  याच चाहत्यांमुळे यशाचं शिखरं सर करणारा शाहरुख सध्या नेटकऱ्यांच्या टिकेचा धनी झाला आहे.

अनेक वेळा शाहरुख सोशल मीडियावर आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतो. त्यामुळे यावेळीही शाहरुखने गणेशोत्सवाचं निमित्त साधत अबरामचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये छोटा अबराम गणपती बाप्पासमोर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं दिसून येत आहे. मात्र अबराम आणि बाप्पाचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी शाहरुखला ‘तू हिंदू आहे की मुस्लीम?’ असा थेट सवाल विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

Our Ganpati ‘Pappa’ is home, as the lil one calls him.

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून शाहरुखनेही त्याच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.  शाहरुख एक मुस्लीम व्यक्ती असून त्याने गणपतीची स्थापना केली आहे. त्यातच अबरामच्या तोंडी बाप्पाऐवजी ‘पप्पा’ शब्द असल्यामुळे शाहरुखला ट्रोल करण्यात आलं आहे. मूर्तीपूजा निषिद्ध असताना तू गणपती कसा अाणतोस असा सवाल काही कट्टर ट्रोलर्सनी विचारला असून तू हिंदू आहेस की मुस्लीम हे एकदा स्पष्ट कर अशी निर्वाणीची भाषा वापरली आहे.

‘माझा लहानगा अबराम गणपतीला एका खास नावाने संबोधतो, त्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘आमच्या घरी गणपती पप्पा आले आहेत’, असं तो म्हणतो’, असं कॅप्शन शाहरुखने या फोटोला दिलं आहे. शाहरुखचं हे कॅप्शन वाचताच अनेकांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत. ‘तु मुसलमान असून गणपतीची पुजा करतोयस तुला नक्की काय झालं आहे?’ असं एका युजरने म्हटलं आहे. तर ‘मुस्लीम धर्मात मुर्तीपूजा करत नाहीत हे साधं तुला माहित नाही का?’ असा प्रश्नही नेटकऱ्यांनी त्याला विचारला आहे.

दरम्यान, शाहरुख जरी मुस्लीम असला तरी त्याची पत्नी हिंदू आहे. त्यामुळे त्यांच्या घरी दोन्ही धर्माचं वातावरण असते. विशेष म्हणजे माझ्या मुलांना कोणताही धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे असं २००५ साली आलेल्या ‘द इनर अॅण्ड आउटर वर्ल्ड ऑफ शाहरुख खान’ या माहितीपटामध्ये शाहरुखने सांगितलं होतं. अनेक जणांनी शाहरूखला ट्रोल केलं असलं तरी काहीजणांनी मात्र समंजस भूमिका घेत, अबरामची आई हिंदू असल्याने त्यांच्या घरी गणपती आणला व अबरामनं प्रार्थना केली तर गैर काय असा सवाल विचारला आहे.