बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपल्या कुटुंबाबरोबर वेळ व्यतित करत आहे. झिरो हा चित्रपट फ्लॉप झाल्यापासून शाहरुख फारसा चर्चेत नाही. नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणारा शाहरुख गेल्या काही काळात सोशल मीडियावर देखील फारसा झळकला नाही. परंतु आता पुन्हा एकदा शाहरुखची चर्चा सोशल मीडियावर आहे.

यावेळी शाहरुख त्याच्या कुठल्याही आगामी चित्रपटासाठी नाही, तर ९०च्या दशकातील एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. शाहरुख ९०च्या दशकात दूरदर्शन वाहिनीसाठी सूत्रसंचालनाचे काम करत होता. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका संगीत कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत शाहरुख सुप्रसिद्ध गायक कुमार सानु यांना गाण्यासाठी आमंत्रण देत आहे.

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी ९०च्या दशकातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत शाहरुख खानवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

याआधी शाहरुख खान त्याने चित्रपटात दिलेल्या एका बोल्ड सीनमुळे चर्चेत होता.

बॉलिवूडमधील प्रत्येक सुपरस्टारचा जीवनप्रवास हा वेगळा आहे. काहींनी पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकली तर काहींचे पहिले चित्रपट फ्लॉप ठरले. अभिनेता शाहरुख खानचाही जीवनप्रवास असाच काहीसा आहे. शाहरुखने ‘दीवाना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीमध्ये पहिले स्थानही पटकावले. मात्र या चित्रपटानंतरचा त्याचा चित्रपट फ्लॉप ठरला. अशा प्रकारे शाहरुखच्या सुरुवतीच्या करिअरमध्ये काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप.

‘दीवाना’नंतर शाहरुखचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. त्यामध्ये ‘माया मेमसाहाब’ या चित्रपटाचादेखील समावेश आहे. मात्र शाहरुखच्या या चित्रपटाची विशेष चर्चा झाली होती. या चित्रपटामध्ये शाहरुखने पहिला बोल्ड सीन दिला होता. शाहरुखसोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपा साही मुख्य भूमिकेत होती. शाहरुख आणि दीपाच्या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे त्यावेळी खळबळ उडाली होती. ‘माया मेमसाहाब’ चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहताने केले होते.

केतन मेहता यांचा ‘माया मेमसाहाब’ चित्रपट ९०च्या दशकातील बोल्ड चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. या चित्रपटाची कथा माया या विवाहित महिलेभोवती फिरताना दिसते. ही विवाहित महिला तिच्या संसारला कंटाळून अनेक पूरुषांसोबत अफेअर करते. काही दिवसांमध्ये या महिलेचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू होतो. चित्रपटात दीपा साहीने मायाची भूमिका साकारली होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.