रोहित शेट्टीची रेकॉर्डब्रेक ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सुसाट चालली आहे. भारतात हा चित्रपट यशस्वी ठरलाच पण, त्यासोबत पाकिस्तानमध्येही चित्रपटाने रेकॉर्ड केला असून तब्बल ४० कोटींची कमाई केली आहे. पाकिस्तानच्या कराची शहरातील तिकीटबारीचे सर्व रेकॉर्डस ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने मोडले आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित शाहरुख-दीपिकाची भूमिका असलेला हा चित्रपट ९ ऑगस्टला ईददिवशी प्रदर्शित झाला होता.
पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनास मिळालेल्या परवानगीनंतर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ येथे सर्वाधिक पसंत झालेला भारतीय चित्रपट असल्याचे पाकमधील सर्वात मोठी चित्रपट वितरण कंपनी आयएमजीसीचे प्रवक्ता मोहम्मद कादरी यांनी सांगितले. तसेच, हा चित्रपट कराची येथील सात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून चित्रपटाने ४० कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी, कराचीमध्ये सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांमध्ये दबंग होता. ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे रोज पाच-सहा शो दाखविले जात असल्याचेही ते म्हणाले.