बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान ‘फॅन’ या त्याच्या आगामी चित्रपटाबाबत कमालीचा उत्सुक असून, चित्रपटात तो गौरव नावाच्या ‘फॅन’ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. एका खोलीत शाहरूखची अनेक छायाचित्रे भिंतीवर चिटकविल्याचे या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. शाहरूखची इतकी छायाचित्रे असलेले चित्रपटाचे पोस्टर लक्षवेधी असे आहे.
ट्रॅक सूट परिधान केलेला आणि भली मोठी ट्रॉफी हातात धरून भिंतीवर चिटकविलेल्या छायाचित्रांना न्याहाळणारा पाठमोरा शाहरूख खानदेखील पोस्टरवर नजरेस पडतो. शाहरूख पहिल्यांदाच स्वत:च्या चाहत्याची भूमिका साकारत असून, चित्रपटकर्त्यांकडून ‘फॅन’चे पोस्टर अधिकृतरित्या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
‘बॅण्ड बाजा बारात’ चित्रपटाचा दिग्दर्शक मनीष शर्माच्या या चित्रपटात शाहरूख सुपरस्टार आणि फॅन अशी दुहेरी भूमिका साकारताना दिसेल. पुढील वर्षी २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात वालूचा दी सॉसा ही शाहरूखची नायिका आहे.