20 November 2019

News Flash

‘कबीर सिंग’च्या भूमिकेशी या कारणामुळे जोडला गेलो – शाहिद कपूर

आगामी ‘कबीर सिंग’ चित्रपटातील डॉक्टरच्या भूमिकेसाठी शाहिदने विशेष तयारी केल्याचं समजतंय.

'कबीर सिंग'

बॉलिवूडमधील कलाकार भूमिकेला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात. भूमिकेची गरज ओळखून ती भूमिका योग्यप्रकारे निभावण्यासाठी ते सखोल अभ्यास करतात. अभिनेता शाहिद कपूरदेखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे. आगामी ‘कबीर सिंग’ चित्रपटातील डॉक्टरच्या भूमिकेसाठी त्याने विशेष तयारी केल्याचं समजतंय.

प्रेमभंग झाल्यामुळे ड्रग व दारूचे व्यसन असलेल्या कबीर सिंगची भूमिका या चित्रपटात शाहिदने साकारली आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीनेही प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकतंच एका मुलाखतीत शाहिदने या भूमिकेबद्दल सांगितले. “या व्यक्तिरेखेच्या तीव्रतेने मला आकर्षून घेतले. यामुळेच सर्वप्रथम मी या चित्रपटाशी जोडला गेलो. मला असं वाटतं की, प्रत्येकातच एक कबीर सिंग दडलेला असतो. म्हणूनच प्रेक्षक या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकतात.” असं शाहिद म्हणाला.

या चित्रपटात शाहिद व्यसानाधीन भूमिकेत असल्यामुळे त्याला चित्रीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात सिगारेट आणि विडीचे सेवन करावे लागेल आहे. “सिगारेटचा वास जाण्यासाठी मी जवळपास दोन तास आंघोळ करायचो.” असंही शाहिदने सांगितलं. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. रुपेरी पडद्यावर डॉक्टर साकारण्यासाठी मुंबईतील मोठ्या हॉस्पिटल्समधील सगळ्या डॉक्टरांना तो प्रत्यक्ष जाऊन भेटला.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत असून हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.

First Published on June 13, 2019 11:51 am

Web Title: shahd kapoor kabir singh djj 97
Just Now!
X