16 February 2019

News Flash

ShaheedDiwas: शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही गाणी आठवतायेत का?

'मेरा रंग दे बसंती चोला...'

शहीद

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांमध्ये शहीद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचे नाव आदराने घेतले जाते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या रणधुमाळीमध्ये या तिघांनी दिलेल्या योगदानाचे आणि त्यांच्या देशभक्तीचे दाखले सर्वांनाच दिले जातात. देशासाठी प्राणांची आहूती देणाऱ्या भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी म्हणजेच २३ मार्चला फाशी देण्यात आली होती. इतक्या लहान वयात प्राण पणाला लावणाऱ्या या शहिदांच्या बलिदानाला चित्रपटसृष्टीमध्ये विविध चित्रपटांद्वारे आजही जिवंत ठेवण्यात आले आहे. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदानाची गाथा ‘शहीद’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’, ‘शहीदे आझम- भगत सिंग’, ‘शहीद-ए-आझाद’ आणि ‘रंग दे बसंती’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. अशाच काही चित्रपटांमधील गाण्यांनीसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

अभिनेता मनोज कुमार, शम्मी कपूर, अजय देवगन, सनी देओल या अभिनेत्यांनी पडद्यावर भगतसिंग यांच्या भूमिका रंगवल्या आहेत. तर या विविध चित्रपटातून काही सहाय्यक कलाकारांनी सुखदेव, राजगुरु यांची पात्रंही तितक्याच ताकदीने रंगवली आहेत. अशा चित्रपटातीलच काही गाणी कधीही ऐकली तरी देशप्रेम आणि त्या वेळी नेमकी काय परिस्थिती उदभवली असेल हा नुसता विचार जरी केला तरीही अंगावर शहारा आल्यावाचून राहात नाही. ही आहेत अशीच काही निवडक गाणी…

ए वतन- १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटातील हे गाणे मोहम्मह रफी यांनी गायले आहे. प्रेम धवन यांनी संगीत दिलेल्या आणि शब्दबद्ध केलेल्या या गाण्याने एक वेगळीच वातावरण निर्मिती होते. ‘ए वतन..ए वतन हमको तेरी कसम’ असे शब्द असणारे हे गाणे आणि ते गाताना रफी साहेबांचे आर्त भाव म्हणजे एक वेगळेच समीकरण.

मेरा रंग दे बसंती चोला- १९६५ च्या ‘शहीद’ या चित्रपटातील कलाकारांसोबतच त्या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यापैकीच एक गाणे म्हणजे ‘मेरा रंग दे बसंती चोला…’ महेंद्र कपूर, राजेंद्र मेहता, मुकेश यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्यातील ‘बडा ही गेहरा नाम है यारो जिसका गुलामी नाम है’ ही ओळ सुरुवातीलाच त्या वेळच्या परिस्थितीची जाणीव करुन देते. फाशीची घटीका समीप येत असताना नेमकी त्या शूरवीरांची नेमकी मनःस्थिती काय असेल याचे चित्रण गाण्यात करण्यात आले आहे.

सरफरोशी की तमन्ना- संथ चाल आणि मोहम्मद रफींचा आवाज या गाण्याच्या जमेच्या बाजू आहेत. ‘देखना है जोर कितना…’ असे म्हणताना मनोज कुमार यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि कारागृहातील ती दृश्ये या शहीद सुपूतांच्या मनाची घालमेल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत.

मेरा रंग दे बसंती चोला (द लेजंड ऑफ भगतसिंग) – सोनू निगम, मनमोहन वारिस आणि ए. आर. रेहमान यांच्या आवाजातील हे गाणे अनेकांनाच देशभक्तीच्या त्या माहोलात घेऊन जाते. ए. आर. रेहमानने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे चित्रण, गाण्याची उडती चाल आणि कलाकारांचा अभिनय गाण्याच्या जमेच्या बाजू ठरत आहेत.

सरफरोशी की तमन्ना (द लेजंड ऑफ भगतसिंग)- भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदानाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटामध्ये जुन्या चित्रपटातील गाणीच रिक्रिएट करण्यात आली होती. गाण्याची चाल काहीशी बदलत त्या वेळच्या प्रेक्षकांच्या अनुषंगाने ए. आर. रेहमानने मूळ भाव तसाच ठेवत गाणे संगीतबद्ध केले आहे. संथ गतीने असणारी गाण्याची चाल, साथीला असणारी संतूरच्या आवाजाची लय आणि पडद्यावर कलाकारांचा अभिनय गाणे परिणामकारकपणे प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेते.

First Published on March 23, 2017 1:34 pm

Web Title: shaheed bhagat singh songs which will definitely fill patriotism in you