बॉलिवूडच्या आगामी ‘रंगून’ चित्रपटाच्या सेटवर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता शाहिद कपूर यांच्यात वाद सुरु असल्याचे समोर आले होते. विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाव्यतिरिक्त शाहिद आणि कंगना एकमेकांकडे पाहत देखील नसल्याची चांगलीच चर्चा रंगाताना दिसते. चित्रिकरण झाल्यानंतर दोघे आपापल्या व्हॅनिटी व्हनमध्ये जाऊन बसतात, असे बोलले जाते. चित्रिकरणावेळीच्या दोन कलाकारांमधील तणावाचा चित्रपटाच्या प्रसिद्धीवर परिणाम होण्याचे संकेत वर्तविण्यात आले होते. दरम्यान ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहिद कपूर दिसणार नाही, अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र आता या चर्चेला शाहिदने पूर्णविराम दिला आहे.

कंगनासोबत कोणताही वाद नसल्याचे शाहिद कपूरने स्पष्ट केले. तसेच आगामी ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैफ अली खान आणि कंगना रणौतसोबत दिसणार असल्याचेही तो म्हणाला. दीपिका पदुकोणच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपटाच्या सेलिब्रिशन पार्टीमध्ये शाहिदने चित्रपटातील सहकलाकार कंगना रणौतशी वाद नसल्याचे सांगितले. आमच्या दोघांच्यात कोणतीही समस्या नसल्यामुळे सैफ आणि कंगना ज्या ठिकाणी प्रसिद्धीसाठी हजेरी लावतील, त्या ठिकणी जाण्यास मी तयार असेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. यावेळी शाहिदने दीपिकाला हॉलिवूड चित्रपटातील पदार्पणासाठी शुभेच्छाही दिल्या. हॉलिवूड चित्रपटात पदार्पण करणे ही दीपिकासाठी मोठी संधी असल्याचे तो म्हणाला.

शाहिद कपूर संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटातून दीपिकासोबत झळकणार आहे. शाहिद आणि दीपिका पहिल्यांदा या चित्रपटातून एकत्र काम करत आहेत. हे दोन्ही कलाकार एकमेकांसोबत काम करण्याने आनंदात आहेत. पण, जेव्हा या दोघांमध्ये प्रणयदृश्य चित्रीत करण्याची वेळ येते तेव्हा शाहिद अस्वस्थ दिसल्याची वृत्ते झळकली होती. या चित्रपटात शाहिद-दीपिका हे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात दीपिका आणि शाहिद यांच्यावर दोन गाणी देखील चित्रित करण्यात आली आहेत. मात्र शाहिद या गाण्यात नृत्य करताना दिसणार नाही.

यापूर्वी शाहिदसोबतच्या शीतयुद्धावर कंगनाने खुलासा केला होता. सेटवर प्रसन्न वातावरण असून आमच्यामध्ये कोणताही तणाव नसल्याचे कंगनाने म्हटले आहे.‘रंगून’च्या सेटवरील कलाकारांमध्ये मैत्री नसल्यामुळे सेटवर मतभेद असल्याच्या अफवा पसरल्याचे कंगना यावेळी म्हणाली. माझे शाहिद किंवा सैफअली खानसोबत मित्रत्व नाही, तसेच सेटवर आपण काम करायला येतो मैत्री करायला नाही, हे देखील लोकांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दात कंगनाने शीतयुद्धाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.