बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत. २०१५ मध्ये लग्नगाठ बांधलेली ही जोडी बऱ्याच वेळा चाहत्यांचं आणि प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे अनेक वेळा या जोडीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. त्यातच मीरा कलाविश्वात सक्रीय नसली तरीदेखील सोशल मीडियावर शाहिदपेक्षा तिचा जास्त वावर असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत लग्नानंतर पहिल्यांदाच शाहिद तिच्यासाठी शेफ झाल्याचं म्हटलं आहे.

सध्या लॉकडाउन असल्यामुळे देशातील इतर नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीदेखील घरीच बसून आहेत. या काळात तेदेखील त्यांच्या कुटुंबीयांना वेळ देत आहेत. त्यातच शाहिदने पहिल्यांदाच मीरासाठी खास पदार्थ तयार केला. या पदार्थाचा फोटो शेअर करत मीराने पाच वर्षांत पहिल्यांदाच शाहिदने कोणतातरी खास पदार्थ केल्याचं सांगितलं.

शाहिदने मीरासाठी खास पास्ता तयार केला होता. याचा फोटो मीराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टाकला आहे. “पाच वर्षांत पहिल्यांदाच माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी जेवण तयार केलं आहे. आजपर्यंत खाल्लेल्या पास्तांपैकी हा सगळ्यात बेस्ट आहे”, अशी कॅप्शन मीराने पोस्ट शेअर करत दिली आहे.

दरम्यान, शाहिद कपूर लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘जर्सी’ हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. यापूर्वी तो ‘कबीर सिंग’ या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक होता. या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली असून या चित्रपटानंतर शाहिदच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.