विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता शाहिद कपूर. त्याचा आज वाढदिवस. शाहिदने आपल्या करियरमध्ये अनेक हिट, फ्लॉप चित्रपट केले. पण या चित्रपट विश्वात येण्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावा लागला आहे. त्याने त्याच्या स्ट्रगलबद्दल अनेक मुलाखतींमध्येही सांगितलं आहे.

शाहिदने त्याच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, करियरच्या सुरुवातीच्या काळात खूप प्रयत्न करूनही त्याला काही काम मिळत नव्हतं. तो बऱ्याच ऑडिशनला जायचा तेव्हा तो रिजेक्टच व्हायचा. मोठ्या पडद्यावर झळकायची संधीच त्याला मिळत नव्हती. एका मुलाखतीत तर त्याने सांगितलं की त्याने शंभर वेळा रिजेक्शनचा सामना केला आहे. या काळात शाहिदकडे ऑडिशनला येण्याजाण्याचेही पैसे नसल्याचं तो सांगतो.

स्टारकीड असूनही त्याला स्ट्रगल चुकला नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की स्टारकीड्सला लवकर मोठ्या संधी मिळतात. मात्र, वडील पंकज कपूर अभिनेते, दिग्दर्शक असूनही त्याला संधी मिळत नव्हती. शाहिदने आपल्या वडिलांच्या नावाचा वापर न करता चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. त्याच्यातल्या टॅलेंटच्या जोरावर हळूहळू त्याला काम मिळू लागलं. सुरुवातीला त्याने काही जाहिरातींमध्ये काम केलं. पुढे बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनही त्यानं काम केलं.

आणि अखेर त्याला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळालीच. ‘इश्कविश्क’ या २००३ सालच्या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पुढे ‘विवाह’, ‘जब वी मेट’ आणि ‘कबीर सिंग’ हे त्याचे काही प्रमुख चित्रपट जे सुपरहिट ठरले. ‘कबीर सिंग’मधला त्याचा लूक तर आजही स्टाईल स्टेटमेंट ठरतोय. यापुढेही शाहिद अशा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आपलं मनोरंजन करत राहील याबद्दल शंका नाही.