बॉलिवूडमधील कलाकार भूमिकेला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात. भूमिकेची गरज ओळखून ती भूमिका योग्यप्रकारे निभावण्यासाठी ते सखोल अभ्यास करतात. अभिनेता शाहिद कपूरदेखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे. आगामी ‘कबीर सिंग’ चित्रपटातील डॉक्टरच्या भूमिकेसाठी त्याने विशेष तयारी केल्याचं समजतंय.

अभिनेता शाहिद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंग’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आहे. कबीर सिंग ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शाहिद कपूरने फार मेहनत घेतली आहे. ही मेहनत घेताना शाहिदने असे काही केले आहे की सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील काही सीन्समध्ये शाहिद ऑपरेशन रूममध्ये दिसत आहे. डॉक्टरांच्या सवयी स्वतःमध्ये मुरवून घेण्यासाठी शाहिदने खऱ्या डॉक्टरांसोबत खूप वेळ घालावला. रुपेरी पडद्यावर डॉक्टर साकारण्यासाठी मुंबईतील मोठ्या हॉस्पिटल्समधील सगळ्या डॉक्टरांना तो प्रत्यक्ष जाऊन भेटला.

शाहिदने सांगितले की, “कबीर सिंग हा एक यशस्वी सर्जन आहे. त्याच्या क्षेत्रात तो सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे त्याची प्रत्येक हालचाल जपून करणे आवश्यक होते. या क्षेत्रातील दिग्गजांशी बोलल्याने मला भूमिकेची सखोलता समजली.” ‘कबीर सिंग’ या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी शाहिदने दिल्लीतील एका कॉलेजमध्ये वेळ घालवण्यास सुरुवात केली. कॉलेजचे विद्यार्थी कशा प्रकारे राहतात, कसे वागतात अशा अनेक गोष्टी शाहिद त्यांच्याकडून शिकत होता.

‘कबीर सिंग’ हा दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. ‘कबीर सिंग’मधील शाहिद कपूरने ‘अर्जुन रेड्डी’मधील विजय देवरकोंडाची भूमिका साकारली आहे.