अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कंगना रणौत आगामी ‘रंगून’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर आणि गाणी सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक विशाल भारद्वाज एका वेगळ्याच कथानकाच्या मदतीने प्रेक्षकांवर छाप पाडण्यासाठी तयार झाले आहेत. पण, या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ आहे असेच म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता शाहिद कपूर यांच्यात काही कारणांवरुन खटके उडाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, शाहिदने मात्र असे काहीही झाल्याच्या चर्चांना दुजोरा दिला नव्हता.

शाहिदने जरी भांडणाच्या चर्चांना दुजोरा दिला नसला तरीही कंगनाने मात्र चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान शाहिदसोबत राहण्याचा अनुभव भयानक होता असे म्हटले आहे. ‘एनडीटीव्ही’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कंगना म्हणाली, ‘आम्ही ज्या दुर्गम भागात चित्रपटाचे चित्रिकरण करत होतो तेथे एका छोटेखानी विश्रामगृहात आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. शाहिद आणि मी आम्ही दोघेही आमच्या टीमसोबत एकाच कॉटेजमध्ये राहिलो होतो. त्यादरम्यान, दर दिवशी सकाळी हिप-हॉप गाण्यांच्या धडधडणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. तो मोठ्या आवाजात सकाळचा व्यायाम करायचा. मला या सगळ्याचा त्रास होत होता. किंबहुना मला माझे कॉटेज बदलून पाहिजे होते’. कंगनाने यावेळी ‘रंगून’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही किस्से सुद्धा सांगितले.

विशाल भारद्वाज यांच्या या आगामी चित्रपटाच्या कथानकाची गरज पाहता अतिशय दुर्गम भागात चित्रपटाचे चित्रिकरण पार पडले आहे. आपण आतापर्यंत काम केलेल्या चित्रपटांपैकी ‘रंगून’ची संहिता सर्वोत्तम होती असे म्हणत कंगनाने चित्रपटाबद्दल तिची भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, कंगना ‘रंगून’मध्ये १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटाचे कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा देणारे आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टरमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे दर्शन होत आहे. धैर्य, गॅम्बल आणि रोमान्सची सांगड घालणारा हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.