अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट ‘कबीर सिंग’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. शाहिद कपूरच्या करिअरमधील २०० कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या १३ दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला गाठला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘कबीर सिंग’ चित्रपटाची एकूण कमाई ट्विटरद्वारे सांगितली आहे. या ट्विटमध्ये ‘कबीर सिंग’ने सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाला कमाईच्या बाबतील मागे टाकल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाने केवळ १३ दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला पार केला आहे तर सलमानच्या ‘भारत’ने १४ दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला पार केला होता. त्या पाठोपाठ ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाने देखील २८ दिवसांमध्ये २०० कोटींची कमाई केल्याचे ट्विटमध्ये सांगितले आहे.

तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती उतरला. केवळ पाच दिवसांतच या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांची कमाई केली. आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाला सुद्धा ‘कबीर सिंग’ चांगलीच टक्कर देत आहे. अर्जुन रेड्डीने बॉक्स ऑफीसवर जितकी कमाई केली होती, त्याहून अधिक कमाई ‘कबीर सिंग’ने अवघ्या तीन दिवसांत केली होती.

प्रेक्षकांनी जरी या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतलं असलं तरी काहींनी यामधील शाहिदच्या भूमिकेवर टीका केली आहे. सतत कोणाच्या तरी अंगावर ओरडणे, एका ठरावीक चौकटीतून समोरच्याकडे पाहणारी, त्याच्याकडून तशीच अपेक्षा ठेवणारी व्यक्तिरेखा प्रत्यक्षात नाहीच असे म्हणता येत नाही. मात्र त्याच्या वागण्याचे समर्थनही करता येत नाही, असं अनेकांचं मत आहे. दुसरीकडे काहींनी शाहिदच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. त्याच्या करिअरमधील ही सर्वोत्तम भूमिका असल्याचं काहींचं म्हणणं आहे.