प्रेमात वय बघायचं नसतं असं म्हणतात. यावर सेलिब्रिटींचा तर बराच विश्वास आहे. बॉलीवूडमध्ये तर वयात बरेच अंतर असलेल्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक-ऐश्वर्या, करिना-सैफ अली खान अशी अनेक नाव या यादीत आहेत. त्यातील एक जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. अभिनेता शाहिद कपूरची पतनी मीरा ही त्याच्यापेक्षा बरीच लहान आहे. या दोघांमध्ये जवळपास १३ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे जेव्हा शाहिद आणि मीराच्या लग्नाचे वृत्त समोर आले तेव्हा त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. शाहिदने मीराशी लग्न करून तिचे करियर खराब केले. तिचे वय फारच कमी आहे. इतकेच नव्हे तर मीरा आई झाली तेव्हाही त्याच्यावर टीका करण्यात आली होती.

आता या सगळ्यावर शाहिदने त्याचे मौन सोडले असून त्याच्यावर टीका करणा-यांना सडेतोड उत्तर दिले आहे. याविषयी शाहिद म्हणाला की, मीराने लवकर लग्न केले याचा अर्थ तिचे संपूर्ण करियर खराब झाले आहे असा होत नाही. आजची स्त्री तिला जे हवं ते करू शकते. त्यांना आज हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपण सर्व पुरुषांना त्यांच्या या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. पुढे शाहिद म्हणाला की, तुम्ही बाहेर जाऊन काम करत असाल किंवा घर सांभाळत असाल पण ते प्रत्येक स्त्रीवर अवलंबून असतं की त्यांना आई कधी बनायचंय. मीरा आणि मी आमच्या निर्णयाने खूप खूश आहोत. आम्ही लवकर लग्न करण्याने किंवा तिच्या आई होण्याने मीराचे भविष्य संपुष्टात  आलेले नाही. काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीरा हे करण जोहरच्या कॉफी विथ करण या रिअॅलिटी शोमध्ये आले होते.

शाहिदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच रंगून या चित्रपटात झळकणार आहे. बॉलीवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘रंगून’ चित्रपटातून कंगना रणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खान हे त्रिकूट दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी जागविण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान, ‘रंगून’ चित्रपटाच्या सेटवर काही दिवसांपूर्वी कंगना रणौत आणि शाहिद कपूर यांच्यात वाद सुरु असल्याचे समोर आले होते. विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाव्यतिरिक्त शाहिद आणि कंगना एकमेकांकडे पाहत देखील नसल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. चित्रिकरण झाल्यानंतर दोघे आपापल्या व्हॅनिटी व्हनमध्ये जाऊन बसायचे असे बोलले जात होते. त्यामुळे चित्रिकरणावेळीच्या दोन कलाकारांमधील तणावाचा चित्रपटाच्या प्रसिद्धीवर परिणाम होण्याचे संकेत वर्तविण्यात आले होते. मात्र आता या चर्चेला शाहिदने पूर्णविराम दिला आहे. कंगनासोबत कोणताही वाद नसल्याचे शाहिद कपूरने स्पष्ट केले. तसेच आगामी ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैफ अली खान आणि कंगना रणौतसोबत दिसणार असल्याचेही तो म्हणाला. दीपिका पदुकोणच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपटाच्या सेलिब्रिशन पार्टीमध्ये शाहिदने चित्रपटातील सहकलाकार कंगना रणौतशी वाद नसल्याचे सांगितले. आमच्या दोघांच्यात कोणतीही समस्या नसल्यामुळे सैफ आणि कंगना ज्या ठिकाणी प्रसिद्धीसाठी हजेरी लावतील, त्या ठिकणी जाण्यास मी तयार असेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.