शाहिद कपूरचे सावत्र वडील व अभिनेते राजेश खट्टर हे वयाच्या ५३व्या वर्षी बाबा झाले आहेत. लग्नाच्या ११ वर्षांनंतर राजेश व वंदना सजनानी यांना मुलगा झाला आहे. अडीच महिन्यांपूर्वीच वंदना यांची प्रसूती झाली होती मात्र नवजात शिशूला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याने त्यांनी हे वृत्त जाहीर केलं नव्हतं. वंदना जुळ्या मुलांची आई होणार होती पण काही वैद्यकीय अडचणींमुळे डॉक्टर एका मुलाला वाचवू शकले नाहीत.

याविषयी ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश म्हणाले, ”या वयात पिता होणं हे खरंच माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. मात्र पन्नाशीनंतर पिता होणारा मी काही पहिलाच किंवा शेवटचा व्यक्ती नाहीये. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. पण आता माझा आनंद गगनात मावेनासा आहे.” अभिनेत्री व निर्माती वंदना म्हणाल्या, ”तीन वेळा गर्भपात, तीन IUI (इन्ट्रायुटेरिन इन्सेमीनेशन), तीन IVF (इन विट्रो फर्टीलायझेशन) आणि तीनवेळा सरोगसी अपयशी ठरल्यानंतर मी आई झाले आहे. त्यामुळे माझा आनंद मी आता शब्दांत व्यक्त करू शकत नाही.” राजेश व वंदना यांनी आपल्या मुलाचे नाव वनराज कृष्णा असे ठेवले आहे.

आणखी वाचा : ‘आशिकी’ फेम राहुल रॉयला आता ओळखणंही कठीण

राजेश खट्टर हे शाहिद कपूरचे सावत्र पिता व ईशान खट्टरचे वडील आहेत. शाहिद हा पंकज कपूर व निलीमा अजीम यांचा मुलगा आहे. जेव्हा शाहिद तीन वर्षांचा होता तेव्हा पंकज व निलीमा यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर निलीमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी दुसरे लग्न केले. निलीमा व राजेश यांच्या घटस्फोटाला १८ वर्षे झाले आहेत.