अभिनेता शाहिद कपूरला कर्करोगाची लागण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. एका वेबसाइटने शाहिदचं नाव न घेता बॉलिवूडमधल्या सुप्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला पोटाच्या कॅन्सरची लागण झाल्याचं वृत्त दिलं होतं. तेव्हापासूनच शाहिदच्या नावाची चर्चा सुरू झाली. इतकंच नव्हे तर उपचारासाठी शाहिद मुंबईबाहेर गेल्याचीही अफवा होती. परंतु, या सर्व चर्चा खोट्या असून शाहिदची प्रकृती ठीक असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शाहिदला कर्करोग झाल्याच्या चर्चा अफवा असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. ‘शाहिदला कर्करोग झाल्याची बातमी आली तरी कुठून? अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात कोणाला काय आनंद मिळतो,’ असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे शाहिद काही कामानिमित्त दिल्लीला गेला असून दोन-तीन दिवसांत मुंबईला परतणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शाहिदच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तो लवकरच एका सुपरहिट तेलुगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. ‘कबीर सिंग’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये तो वैद्यकीय विद्यार्थ्याची भूमिका साकारणार आहे.

याआधी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनाही कर्करोग झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर कपूर कुटुंबीयांनीही असं काहीच नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर इरफान खान, सोनाली बेंद्रे या प्रसिद्ध कलाकारांवर सध्या कॅन्सरवरील उपचार सुरू आहेत.