आजवर ‘चॉकलेट बॉय’ ही शाहीद कपूरची प्रतिमा राहिलेली आहे. पण, सध्या बॉलिवूडची परिस्थिती पाहता ‘फटा पोस्टर निकला हिरो’ व्हायचे आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचे दिवस गेले आहेत. सध्या नव्याजुन्या कलाकारांची एवढी गर्दी आहे की यात आपले स्थान टिकवायचे असेल तर एखाद्या ‘आर. राजकुमार’सारख्या चित्रपटासाठीही वर्षांनुवर्ष वाट पहावी लागते. आपण पडद्यावर विविध भूमिकांमधून दिसत राहणे ही गरज ओळखलेल्या शाहीदला आपल्या आगामी चित्रपटासाठी ही चॉकलेट बॉयची प्रतिमा पूर्णपणे मोडावी लागणार आहे.
‘आर. राजकुमार’च्या यशामुळे सध्या आनंदी असलेला शाहीद आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत गुंतला आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’ या चित्रपटात शाहीद मुख्य भूमिकेत आहे. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’वर आधारित हा चित्रपट करायला मिळाल्यामुळे आनंदलेल्या शाहीदला या संधीसाठी आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वात कटू निर्णय घ्यावा लागला आहे, तो म्हणजे टक्कल करून घेण्याचा. शाहीदला त्याची भूमिका ऐकवण्यात आली तेव्हा चित्रपटातील भूमिके साठी त्याला टक्कल करून घ्यावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. तेव्हा मात्र आपल्या केसांच्या प्रेमात असलेल्या शाहीदच्या जिवाची कालवाकालव झाली. या लुकमध्ये काही बदल होऊ शकेल का? इथपासून ते टक्कल करावे लागलेच तर कसे दिसू आपण अशा प्रत्येक बारीकसारीक तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न त्याने केला.
पण, एवढे सगळे करूनही त्याला काही मनासारखा उपाय सापडला नाही. बरे! याच विशाल भारद्वाजमुळे त्याला ‘कमिने’सारखा चित्रपट करता आला आणि त्याच्या अभिनयाचे कौतुकही झाले. त्यामुळे ‘हैदर’वर पाणी सोडून चालणार नाही, हे मनोमन उमगलेल्या शाहीदने भूमिकेसाठी आपले केस त्यागण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. ऐन तारुण्यात आणि कारकि र्दीच्या नाजूक वळणावर असा निर्णय घेण्याचे धाडस अजून कोणत्याही तरूण कलाकाराने केलेले नाही. याला अपवाद फक्त आमिर खानचा. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर भूमिकेसाठी काहीही करू शकतो. म्हणून ‘गजनी’च्या वेळी आमिरने आपले पूर्ण केस कापले होते. एवढेच नाही तर प्रमोशनसाठी हातात कात्री घेऊन इतरांचेही के स कापले होते. अर्थात, शाहीदने हा निर्णय घेतला तरी त्याचे चाहते मात्र त्याला या रूपात स्वीकारायला तयार नाहीत. आपली कारकिर्द टिकवण्यासाठी घेतलेला हा कठीण निर्णय शाहीदला फ ळतो की नाही हे कळेलच!