बॉलिवूडमध्ये ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांच्या इतिहासाचे एक पान सिनोरसिकांसमोर सादर करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग ही सुप्रसिद्ध जोडी या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येऊ शकते. येणाऱ्या काळात ‘पद्मावती’चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून या चित्रपटात ऐतिहासिक काळाच्या पार्श्वभूमीचा आधार घेत संजय लीला भन्साळी अल्लाउद्दीन खिलजी आणि मेवाडची राणी पद्मावती यांच्याशी निगडीत कथानकावर चित्रपट साकारणार आहेत अशी माहिती मिळते.
दीपिकाने मानधनात वाढ करण्याची मागणी केल्याच्या चर्चेला उधाण असतानाच आता या चित्रपटातील तिच्या पतिच्या भूमिकेचा शोध संपला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. शाहरुख खान, फवाद खान यांच्या नावांची चर्चा असतानाच आता ‘उडता पंजाब’ फेम अभिनेता शाहिद कपूर ही भूमिका साकारणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. शाहिद या चित्रपटात पद्मावतीचा पती, चित्तोढचा राजा रावल रतन सिंगची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. सुत्रांच्या माहितीनुसार याआधीही शाहिदला या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती, पण काही कारणाने त्याने या भूमिकेत रस दाखवला नसल्यामुळे भन्साळींनी त्या पात्रावर पुन्हा काम केले आणि सरतेशेवटी शाहिदची या भूमिकेसाठी वर्णी लागली. दीपिकाप्रमाणेच शाहिदलाही या भूमिकेसाठी चांगले मानधन मिळणार आहे अशी माहिती मिळतं असून चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिदने त्याच्या लूक्सवर मेहेनत घ्यायला सुरुवात केल्याचे कळत आहे. त्यामुळे ‘पद्मावती’च्या निमित्ताने सिनेरसिकांना शाहिद आणि दीपिकाच्या रुपात एका नव्या जोडीला एकत्र पाहण्याची संधी मिळेल.