हिंदी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अर्थात शाहिद कपूरला नुकताच दादासाहेब फाळके एक्सिलन्स पुरस्कार मिळाला आहे. पद्मावत चित्रपटामध्ये शाहिदने महारावल रतनसिंह ही व्यक्तिरेखा साकारली होती. ही व्यक्तीरेखा त्याने हुबेहूब वठवल्यामुळे समिक्षकांबरोबरच प्रेक्षकांनाही त्याची भुरळ पडली. याच कारणास्तव त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळताच त्याने त्याची पत्नी मीरा राजपूत हिला तो समर्पित केला आहे. पुरस्कारप्राप्त झाल्यानंतर शाहिदने आणखी जिद्दीने आणि जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या शाहिद कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच तो आणखी एका चित्रपटामध्ये झळकण्याची शक्यता आहे.
दिग्दर्शक राजा कृष्णन मेनन यांचा आगामी चित्रपट त्याने साइन केल्याची चर्चा रंगत आहे. हा चित्रपट एका खेळावर आधारित असून यामध्ये शाहिद एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाविषयी अधिक माहिती स्पष्ट झाली नसली तरी देखील या चित्रपटासाठी शाहिदला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे असे दिग्दर्शक राजा कृष्णन मेनन यांनी सांगितले.

वाचा : …म्हणून सलमानने केला जम्मू- काश्मीरचा दौरा

 

‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर शाहिद नव्या चित्रपटाच्या तयारीला लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या चित्रपटासाठी शाहिदला एका बॉक्सरप्रमाणेच शरीरयष्टी करावी लागणार आहे. तसेच बॉक्सिंगसाठी आवश्य़क असलेल्या नव्य़ा गोष्टीही शिकाव्या लागणार आहेत.