अभिनेता शाहिद कपूर सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचं दिसतंय. ‘कबीर सिंह’ या सिनेमाच्या यशानंतर शाहिदने नुकतचं त्याच्या आगामी ‘जर्सी’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलंय. दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सध्या तो डीके आणि राज यांच्या एका बिग बजेट वेब सिरीजच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. अशात शाहिद पुन्हा एकदा एका ऐतिहासिक सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
‘पद्मावत’ या संजय लीला भन्साळी यांच्या बिग बजेट सिनेमातून शाहिदने महाराज महारावल रतन सिंह ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारली होती. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांनी मोठी पसंती दिली. तर एका रिपोर्टनुसार शाहिद कपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एका बिग बजेट सिनेमात महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जातंय. ‘कबीर सिंह’ सिनेमाचे निर्माते अश्विन वर्दे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमावर काम सुरु करणार आहेत. यासाठी त्यांनी साउथ सिनेसृष्टीतील ‘लायका प्रोडक्शन’ या बड्या कंपनीसोबत हातमिळवणी केलीय. तर सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शाहिदला विचारणा करण्यात आलीय. अद्याप शाहिदने या भूमिकेसाठी होकार कळवलेला नाही. मात्र या भूमिकेसाठी निर्मात्यांसोबत त्याची चर्चा सुरु असल्याचं वृत्त आहे.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमाची निर्मिती करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक जण उत्सुक आहेत. यात रितेश देशमुखच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. रितेश देशमुख महाराज्यांच्या जीवनावर आधारित सिनेमावर काम करत असून यात तो स्वत: महाराजांच्या भूमिकेत झळकणार अशा चर्चा आहेत. तर अली अब्बास जफर आणि रोहित शेट्टीदेखील सिनेमाच्या माध्यामातून महाराजांचा जीवनप्रवास रंगवणार असं बोलंल जातं होतं. मात्र अद्याप तरी यापैकी कुणीही सिनेमाची घोषणा केलेली नाही.
‘कबीर सिंह’ नंतर निर्माता अश्विन वर्दे बिग बजेट सिनेमाच्या तयारीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या सिनेमात आता शाहिद झळकणार का? हे मात्र जाणून घेण्यासाठी चाहत्यांना काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 27, 2021 1:53 pm