बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूतला वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याने २००० रुपयांचा दंड भरावा लागला. आता तुम्ही म्हणाल दोन हजार रुपये या सेलिब्रिटींसाठी फार काही मोठी रक्कम नाही. ते अगदी सहज ही रक्कम भरू शकतात. तुमचं अगदी बरोबर आहे. पण, ज्या पद्धतीने मीराने हे सर्व प्रकरण हाताळल त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे.

सेलिब्रिटींकडून बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळते. त्यात बरेचजण केवळ आपण सेलिब्रिटी आहोत म्हणून मनाला हवं तसं वागू शकतो, अशा आवेशात असतात. मद्यपान करून गाडी चालवणं, वाहतुकीचे नियम मोडणं हे त्यांच्यासाठी काही नवीन नसतं. मीराकडूनही अनवधानाने वाहतुकीचा नियम मोडला गेला. पण, तिने इतर सो कॉल्ड सेलिब्रिटींप्रमाणे हुज्जत न घालता दंड भरला. बऱ्याचदा शाहिद आणि मीरा वांद्रे येथील रेस्तराँमध्ये जेवणासाठी जाताना पाहिले गेलंय. मात्र, यावेळी मीरा एकटीच रेस्तराँमध्ये गेली होती. तेव्हा तिच्याकडून एक चूक घडली. नो पार्किंग झोनमध्ये गाडी उभी करून ती रेस्तराँमध्ये गेली होती. तेथून परत आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तिच्या हातात दोन हजार रुपयांचे चलन ठेवले. नो पार्किंग झोनमध्ये गाडी उभी केल्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल, असे वाहतूक पोलिसांनी मीराला सांगितले. आता चूक झाली तर ती मान्य तर करावीच लागणार ना. आपली चूक कळल्यावर मीराने वाहतूक पोलिसांसोबत कोणताही वाद न घालता दंडाची रक्कम भरली.

mira-2

mira-1

 

याआधीही मीरा तिच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मीराची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीदरम्यान आपल्या मातृत्वाविषयी मत मांडताना मीराने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांचा रोष तिने ओढावला होता. ‘फक्त काही तास मुलीसोबत घालवून मला कामासाठी घराबाहेर जायचे नाहीये. जर असंच करायचे असते तर मला तिची गरजच काय होती? मिशा काही कुत्र्याचे पिल्लू नाही. मला तिला मोठं होताना पाहायचे आहे.’, असे मीराने म्हटले होते. तिच्या या वक्त्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. शेवटी शाहिदलाच त्याच्या पत्नीची पाठराखण करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला होता.