बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांनी आज एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे या दाम्पत्याच्या घरी आज आनंदाचे वातावरण आहे. मात्र, आजच आणखी एक अशी गोष्ट त्याच्यासोबत घडली ज्यामुळे त्याला धक्काच बसला. आजच्याच दिवशी त्याचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले. हॅकर्सने त्याच्या अकाऊंटवर काही फोटो अपलोड कले त्यात एक फोटो कतरिना कैफचा असून त्यावर त्याने आक्षेपार्ह टिपण्णीही केली आहे. हॅक झाल्यानंतर काही वेळातच हे अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले. मात्र, तोपर्यंत हॅकरने त्यावर २० ट्विट केले होते. यामुळे शाहीदला काहीशा मनस्तापालाही सामोरे जावे लागले.


इतकेच नाही तर हॅकरने अल्लाउद्दीन खिलजीवरुनही शाहिदच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. यामध्ये म्हटले आहे की, राजा अल्लाउद्दीन खिलजीचे पात्र दुष्ट दाखवण्यात आलेले नाही जसे तुम्हाला दाखवण्यात आले आहे. पद्मावत या चित्रपटातील पात्रावरुन हॅकरने हा मजकूर टाकला आहे. या चित्रपटात शाहीदने राणी पद्मावतीचा पती राजा रतन सिंहची भुमिका साकारली होती. तर रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीची भुमिका साकारली होती. पद्मावतीच्या भुमिकेत दीपिका पदुकोन होती.

दरम्यान, शाहीद आज दुसऱ्यांदा बाप झाल्याचा आनंद साजरा करीत आहे. गुरुवारी तो आपली मुलगी मीशा आणि संपूर्ण कुटुंबासह पत्नी मीरा आणि नुकतेच जन्मलेल्या मुलाला पहायला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात पोहोचला.