‘इंग्लिश विंग्लिश’नंतर चार वर्षांनी दिग्दर्शक म्हणून गौरी शिंदेचा नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर दुसऱ्या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढणार हे साहजिक होतं. मात्र या वेळी पुन्हा एकदा फिल्ममेकिंगच्या रूढ पद्धतींना फाटा देत एक वेगळा प्रयोग गौरीने ‘डीअरजिंदगी’त केला आहे. या चित्रपटात तथाकथित मनोरंजक मूल्यांचा अभाव आहे त्याऐवजी आपल्या प्रमुख पात्राच्या मनात शिरून तिच्या नजरेतून जिंदगीचे गणित मांडण्याचा प्रयत्न अर्थातच अलिया भट्टमुळे ‘डीअर’ झाला आहे.

[jwplayer poPcqTHM]

अलिया भट्ट तरुण कलाकारांमधली सळसळती ऊर्जा असलेली अभिनेत्री आणि शाहरूख खान पुन्हा एकदा समजूतदार पण तितकाच चांगली विनोदबुद्धी असलेला अभिनेता या दोघांचं एकत्रित येणं म्हणजे खूप धम्माल नाटय़, अफलातून केमिस्ट्री अशा अपेक्षांचं अजब कडबोळं प्रेक्षकांच्या मनात तयार झालेलं असतं. प्रत्यक्षात तसं काहीच घडत नाही. कारण इथे दिग्दर्शक आपल्या व्यक्तिरेखांशी पूर्णपणे प्रामाणिक राहिला आहे. छोटय़ा-मोठय़ा गोष्टींनीही अजब डिप्रेशन येणाऱ्या या तरुणाईच्या जगाचं कायरा (अलिया भट्ट) प्रतिनिधित्व करत. ती खूप सुंदर आहे. व्यवसायाने सिनेमॅटोग्राफर, वृत्तीने स्वतंत्र, अभिमानी बाण्याची आणि तरीही प्रचंड हळवी आहे. छोटय़ा-मोठय़ा जाहिरातींचे काम करणाऱ्या कायराला आपला स्वत:चा चित्रपट करायचा आहे. तिच्याकडे ती संधी चालूनही येते. मात्र आलेली संधी ही आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आहे की, ज्याच्याकडून ती आली आहे तो आपल्या प्रेमात असल्याने मिळाली आहे हे तिला कळत नाही. आपल्या रिलेशनशिपबद्दल गोंधळलेली, एकाला नाही- दुसऱ्याला हो म्हणण्याच्या नादात स्वत:कडेच आलेला नकार न पचवू शकलेल्या कायराच्या मनातला गोंधळ दिग्दर्शकाने खूप वेगवेगळ्या प्रसंगांतून आणि विशेषत: कायराच्या वागण्यातूनच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कायराची मित्रमंडळी, तिच्या व्यवसायाचा-जगण्याचा थोडासा हलकाफुलका आणि बराचसा आत्ताच्या पिढीच्या जगण्याच्या जवळ जाणारा परीघ चितारला आहे. शाहरूख खानच्या प्रवेशापेक्षाही त्याची चित्रपटावरची पकड ही इंटरव्हलनंतरची आहे.

कायरा आणि ‘दिमाग का डॉक्टर’ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जहांगीर खान यांच्या चर्चासत्रांतून कायराची जिंदगी आणि मग तिच्या गोंधळलेपणामागच्या, सततच्या एकटेपणामागच्या भावनेची सलत असलेली गोष्ट  बाहेर पडते. अर्थात, कायराच्या लहानपणीच्या अनुभवातून आलेला हा सल इतका व्यक्तिसापेक्ष आहे की पाहणारा प्रत्येक जण या कथेशी, तर्काशी सहमत होतोच असे नाही. त्यामुळेच चित्रपट फसवा ठरतो. त्याच्या जोडीने कायरा आणि जहांगीरमधल्या गप्पा हाच चित्रपटाला पुढे नेणारा मुख्य धागा असल्यानेही चित्रपट तिथेच रेंगाळतो आहे अशी भावना निर्माण होते. कायरा मानसिक रुग्ण नाही, लहानपणी घडलेले अनेक प्रसंग त्या वेळी काहीच शिकवून जात नाहीत. मात्र त्याचे बरेवाईट आघात, परिणाम मनावर सोडतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने प्रत्येक भावनिक गुंत्याची उकल वेगळी, त्याची उत्तरंही वेगळी आणि त्यामुळे होणारा बदल हा तर कित्येकदा फक्त त्या व्यक्तीवर अवलंबून असतो. त्यामुळे कायराची गोष्ट पाहण्यापेक्षाही समजावून घेण्याची आहे. कोणाच्या तरी मदतीने आपल्या अडचणीतून बाहेर पडताना, खरं म्हणजे स्वतंत्र होत असतानाही पुन्हा त्याच कणखर व्यक्तीचा हात धरावा हा मोह होणंही तितकंच साहिजक आहे. जे चित्रपटात कायराचा जहांगीरला धरून राहण्याच्या हट्टातून येतं, मात्र इथे दिग्दर्शिकेच्या धाडसाचं कौतुक करावंसं वाटतं की, तिने कुठेही या नात्यांच्या रूढ ठोकताळ्यांचा वेध न घेता व्यक्तिरेखांची प्रामाणिक मांडणी केली आहे. त्यामुळे चित्रपट शब्दबंबाळ आणि कुठलाही भावनिक नाटय़ नसलेला, वरवरचा असा वाटू शकतो. कायरा आणि अलिया हे घट्ट समीकरण असावं इतकी ती या भूमिकेत फिट बसली आहे. शाहरूख खानचाही वावर तितकाच प्रसन्न आणि खरा वाटतो. इथे पहिल्यांदाच शाहरूखचं खरं वय दिग्दर्शकाच्या कॅमेऱ्यानंही लपवलेलं नाही. कायराची मित्रमंडळी म्हणून इरा दुबे, ‘फोबिया’मध्ये काम केलेली अभिनेत्री यशस्वनी दायमा या दोघींनीही जान आणली आहे. कायराचे प्रियकर म्हणून आलेले अंगद बेदी आणि अली जफर नावापुरते आहेत. कुणाल कपूर नावापुरता असलेला तरी बऱ्याच वर्षांनी दिसलेला त्याचा वावर तितकाच चांगला आहे. हा चित्रपट खऱ्या अर्थाने अलिया भट्टचाच आहे आणि तिच्या सहजाभिनयाने तो खरोखर ‘डीअर’ झाला आहे. चौकटीबाहेर जाऊन स्त्रीच्या मनात शिरून, तिच्या छोटय़ा-छोटय़ा भावनांनाही पडद्यावर अस्सलपणे रंगवण्याची ताकद आता या घडीला गौरी शिंदेकडे आहे आणि ते ‘डीअर जिंदगी’च्या निमित्ताने अधोरेखित झालं आहे.

डीअर जिंदगी

निर्माता – गौरी खान, करण जोहर,गौरी शिंदे

दिग्दर्शक – गौरी शिंदे

कलाकार – अलिया भट्ट, शाहरूख खान, कुणाल कपूर, अंगद बेदी, अली जफर, इरा दुबे, यशस्वनी दायमा.

[jwplayer psUg1N0g]