बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा २०१८मध्ये ‘झीरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. आता शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम दिसणार आहे.

वॉर चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच हा एक बिग बजेट चित्रपट असण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार असून जॉन खलनायकाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. पण या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसात शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर आता शाहरुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या प्रोडक्शन कंपनी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे ठिकाण ठरवत असल्याचे म्हटले जात आहे.