बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने ‘माया मेमसाब’, ‘स्वदेश’ आणि ‘चक दे इंडिया’सारख्या मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या चित्रपटांमधून काम केले आहे. असे असले तरी, मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा चित्रपट म्हणजे काय याबाबतचे कोडे त्याला उमगलेले नाही. चित्रपटातील त्याची उपस्थिती कोणत्याही सर्वसाधारण चित्रपटालादेखील मुख्य प्रवाहातील चित्रपट बनवत असल्याचे त्याचे मत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमान्सचा बादशाह अशी या ४८ वर्षीय सुपरस्टारची प्रतिमा आहे. चित्रपट स्वीकारताना काही प्रमाणात जोखिम उचलूनसुद्धा चित्रपटसृष्टीतला आपण एक मोठा स्टार असल्याचे शाहरूखचे म्हणणे आहे. त्याचा अभिनय असलेले प्रयोगशील चित्रपटदेखील गर्दी खेचण्यास समर्थ ठरले आहेत. मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा चित्रपट हा काय प्रकार असतो? असा प्रश्न उपस्थित करत शाहरूख म्हणाला, मला तुम्ही मुख्य प्रवाहापासून वेगळ्या चित्रपटातील भूमिका द्या आणि तो चित्रपट मुख्य प्रवाहातला चित्रपट बनतो की नाही ते पाहा. जसे की ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा चित्रपट होता, तरीसुद्धा या चित्रपटाने चांगली कमाई केली. माझ्या कारकीर्दीतले हे सर्वात मोठे यश होते. मी ज्या चित्रपटात काम करतो तो चित्रपट मोठा होतो, याचाच अर्थ मी एक मोठा स्टार आहे, असे मत व्यक्त करीत तो म्हणाला, माझा अभिनय असलेला मुख्य प्रवाहापासून वेगळा असलेला चित्रपटदेखील प्रेक्षक बघतात आणि मग तो चित्रपट मुख्य प्रवाहातील चित्रपट बनतो. मी ‘माया मेमसाब’, ‘ओह डार्लिंग ये है इंडिया’, ‘डर’, ‘बाजीगर’, ‘स्वदेश’, ‘चक दे इंडिया’सारख्या चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे, मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या चित्रपटामधून भूमिका साकारण्याची इच्छा होते, त्यावेळेस मी अशा चित्रपटांमधून भूमिका साकारतो.