‘डिअर जिंदगी’च्या पोस्ट्सच्या निमित्ताने नुकताच ट्रेंडमध्ये असणारा बॉलीवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खान आता एका नव्या वृत्तामुळे चर्चेत आला आहे. प्राप्तिकर विभाग आणि चित्रपट सृष्टीतील कलाकार यांच्यातले नाते तसे फारच जुने आहे. याच प्राप्तिकर विभागाने अभिनेता शाहरुख खानला त्याच्या परदेशांतील गुंतवणुकीबाबत विचारणा करणारी नोटीस पाठवली आहे. प्राप्तिकर विभागाने शाहरुखच्या ब्रिटिश वर्जिन आयलॅंड, बर्म्यूडा, दुबई आणि इतर देशांमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबत विचारणा केली आहे.
कलम १३१ अन्वये शाहरुखला ही नोटीस पाठविण्यात आली असून अद्यापही शाहरुखची विविध देशातील मालमत्ता अघोषित आहे, असे कोणतेही वृत्त हाती आलेले नाही. नोटीस पाठवल्यानंतरच तपासाची प्रक्रिया पूर्ण होउनच याबाबतची संक्षिप्त माहिती समोर येणार आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान दोषी आढळल्यास त्याला न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटसृष्टीतील अनेकांना यासंदर्भातील नोटीस देण्यात आली आहे. काळ्या पैशाची मुळे शोधण्यासाठी चुकीच्या मार्गांनी कमवलेला पैसा आणि भारतीयांच्या परदेशी बॅंकांमधील खात्यांवर प्राप्तिकर विभाग करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे शाहरुखला पाठवलेल्या या नोटीशीबाबत त्याची प्रतिक्रिया काय असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.