अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातून किंग खान आणि आलिया भट्ट प्रथमच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे चित्रपट रसिकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने किंग खान सध्या अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर येत आहे. अशाच एका मुलाखतीदरम्यान शाहरुखने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत.

शाहरुखने बोलण्याच्या ओघात डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेरेनियाचे त्याच्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाशी असलेले कनेक्शन नुकतेच उघड केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा हिलरी क्लिंटन यांनाच जास्त पसंती देण्यात आली होती. पण शाहरुखने तर ट्रम्प यांच्या खासगी जीवनावरच प्रश्न केला आहे. एका मुलाखतीदरम्यान शाहरुखला विचारण्यात आले होते की, आलियासोबत ‘डिअर जिंदगी’मध्ये काम करताना त्यांना कोणत्या प्रकारची अडचण नाही अली का?

या प्रश्नाचे उत्तर देत शाहरुख म्हणाला की, ‘मी चित्रपटांमध्ये आतापर्यंत माझ्यापेक्षा २० वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत काम केले आहे. आताही मी या (डिअर जिंदगी) चित्रपटामध्ये काही पाच वर्षांच्या मुलीसोबत रोमान्स करत नाहीये. माझ्यामते वयाचं बोलावं तर आपल्या इथे हा एक न्यूनगंडाचा विषय आहे. तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचच उदाहरण का घेत नाही? कोणतीही प्रेमकहाणी जर वयामध्ये मोठा फरक असूनही यशस्वी होत असेल तर खरच हे त्या प्रेमकहाणीचे यश आहे’, असे शाहरुख म्हणाला.


या चित्रपटाबद्दल पुढे शाहरुख म्हणाला की, ‘डिअर जिंदगी ही एक प्रेमकहाणी आहे. सर्वसामान्य स्त्री आणि पुरुषामध्ये असणाऱ्या प्रेमकहाणीपेक्षा ही काहीशी वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही ज्या वेळी हा चित्रपट पाहाल त्यावेळी वयाच्या अंतराचा विषय दूर-दूर पर्यंत तुमच्या लक्षातही येणार नाही’, असेही त्याने स्पष्ट केले.

‘डिअर जिंदगी’ या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, कुणाल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुख आलियाच्या मेन्टॉरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.