सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्याभोवती प्रसिद्धीचं वलय हे आलंच. या प्रसिद्धीच्या वलयामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टी वाऱ्यासारख्या पसरत असतात. त्यांचं वैयक्तिक आयुष्य खासगी न राहता ते सोशल होऊन जातं. प्रसिद्धीझोतात असलेल्या या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक असतात. त्यामुळे ही कलाकारमंडळी चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करुन त्यांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या शाहरुख खानच्या मुलाचं आर्यनचं सोशल अकाऊंट हॅक केल्याचं समोर आलं आहे.
आर्यनचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं असून त्याने स्वत:ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर जर या अकाऊंटवरुन कोणतेही फोटो,पोस्ट किंवा मेसेज आले तर त्याकडे दुर्लक्ष करा असंही आर्यनने सांगितलं आहे.
‘माझं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. त्यामुळे जर या अकाऊंटवरुन कोणताही मेसेज किंवा फोटो, पोस्ट शेअर झाली,तर त्याकडे दुर्लक्ष करा’, अशी पोस्ट आर्यनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.
दरम्यान, आर्यनपूर्वी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचे सोशल अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत. यामध्ये शाहिद कपूर, अनुपम खेर, ऋषी कपूर, अभिषेक बच्चन, महेश भट्ट, करण जोहर, श्रुती हासन आणि अली जफर या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 1:58 pm