सध्या संपूर्ण देश करोना व्हायरसशी लढण्यासाठी एकत्र आला आहे. सर्वसामान्य व्यक्तींसोबत व्यावसायिक आणि कलाकारही सरसावले आहेत. प्रत्येकजण आपापल्या परिने मदतीचा हात पुढे करत आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखही यात मागे नाही. त्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदत तर साडेपाच हजार लोकांना जेवण आणि अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार असल्याची घोषणा ट्विटरद्वारे केली. त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकताच शाहरुखने ट्विटरवर एक ट्विट मराठीमध्ये केले आहे. या ट्विटमध्ये त्याने ‘या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत. कारण थेंबे थेंबे तळे साचे. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल..आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद!’ असे म्हटले आहे. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे करत होते. पण शाहरुखने मदत न केल्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली होती. पण आता शाहरूख खान, गौरी खान, जुही चावला आणि जय मेहता यांचा आयपीएलमधील केकेआर संघ पंतप्रधान सहायता निधीमध्ये रक्कम दान करणार असल्यामुळे सर्वचजण आनंदी असल्याचे दिसत आहे. तसेच गौरी आणि शाहरूखची रेड चिलीज एंटरटेनमेंट महाराष्ट्र सीएम रिलीफ फंडाला रक्कम दान करणार आहे. अशा प्रकारे शाहरुख आणि त्यांच्या कंपन्या मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे मदतीसाठी काम करणार आहेत.