टेलिव्हिजन विश्वात आपल्या सौंदर्याने अनेकांनाच घायाळ करणारी आणि नेमीच प्रकाशझोतात असणारी अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रुबिनाचं मन जिंकणाऱ्या ‘त्या’ खास व्यक्तीचं तिच्या आयुष्यात आगमन झालं आहे. गेले काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर रुबिना आणि तिचा प्रियकर अभिनव शुक्ला यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनवने रुबिनाला लग्नाची मागणी घातली असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं प्रपोजल स्वीकारल्याचं तिने जाहीर केलं. टेलिव्हिजन विश्वात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही जोडी काही दिवसांनी विवाहबंधनात अडकणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याविषयीची माहिती दिली.

रुबिना आणि अभिनव यांनी कधीही त्यांचं नातं सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न केला नाही. सोशल मीडियावर या दोघंनीही त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर ठेवली. अशा या बहुचर्चित जोडीच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या वळणासाठी चाहत्यांमध्येही उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. अभिनवविषयी रुबिनाने नेहमीच आपलं प्रेम खुलेपणाने व्यक्त केलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रुबिना म्हणाली होती, ‘तो एक जबाबदार पुरूष आहे. त्याच्या अस्तित्वानेच माझ्या आयुष्याला महत्त्वं लाभलं आहे. मला विचाराल तर, ज्यावेळी दोन प्रभावी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापुढे इतर सर्व गोष्टी फिक्या पडतात.’

पाहा : टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात

रुबिना आणि अभिनव अभिनय क्षेत्रासोबतच मॉडेलिंगमध्येही सक्रिय आहेत. अभिनवला फोटोग्राफी आणि गिर्यारोहणाचीही आवड आहे. या दोघांचाही एकमेकांवर असणारा विश्वास आणि त्या बळावरच उभं असणारं त्यांचं नातं पाहता येत्या काळात रुबिना आणि अभिनवचा लग्नसोहळा नेमका कसा असेल याकडेच संपूर्ण टेलिव्हिजन विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.