चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत बॉलिवूडचा खलनायक ठरलेला ‘क्राइम मास्टर गोगो’ अर्थात अभिनेता शक्ती कपूरचा आज वाढदिवस. चित्रपटांमध्ये अनेक वेळा खलनायकाची भूमिका साकारल्यामुळे शक्तीला ‘बॅड बॉय’ हे नाव मिळालं. चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेला एक वेगळी उंची गाठून दिल्यानंतर शक्ती कपूर यांनी विनोदी कलाकाराच्याही भूमिका अत्यंक खुबीने वठविल्या. विशेष म्हणजे लोकप्रिय ठरलेल्या या कलाकाराला एका अपघातामुळे पहिला ब्रेक मिळाला. एका रिअॅलिटी शोमध्ये त्याने त्याच्या पहिल्या चित्रपटाविषयीचे काही रंजक किस्से सांगितलं.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान यांच्यामुळे शक्तीला कलाविश्वामध्ये पहिला ब्रेक मिळाला. करिअरच्या सुरुवातीला ज्यावेळी शक्ती स्ट्रगल करत होता. त्यावेळी एकेदिवशी अचानक लिंकिंग रोडवर शक्तीची गाडी फिरोज खान यांच्या मर्सिडिज गाडीला धडकली. मर्सिडिज गाडीला धडक बसल्यानंतर शक्ती घाईघाईमध्ये गाडीतून बाहेर पडला. त्यावेळी शक्तीसमोर एक सहा फूट उंच माणूस उभा होता. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून चक्क फिरोज खान होता. विशेष म्हणजे फिरोज खानला असं समोर पाहिल्यानंतर शक्तीने लगेचच त्यांना स्वत:च नाव आणि पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा केल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर ‘मला तुमच्या चित्रपटात काम करण्याची संधी द्या’, असं तो यावेळी म्हणाला. मात्र शक्तीचं हे बोलणं ऐकल्यानंतर फिरोज खान पुन्हा गाडीत जाऊन बसले.

दरम्यान, त्याच दिवशी संध्याकाळी शक्ती त्याचा मित्र के. के. शुक्ल याच्या घरी गेला. त्यावेळी के. के. फिरोज खान यांच्या ‘कुर्बानी’ चित्रपटासाठी लेखनाचं काम करत होता. विशेष म्हणजे त्यावेळी फिरोज खान त्यांच्या चित्रपटातील एका विशिष्ट भूमिकेसाठी, पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका माणसाच्या शोधात आहे, जो त्यांच्या गाडीला धडकला होता, असं सांगितलं. के. के. शुक्लने सांगितलेली घटना ऐकल्यानंतर शक्ती मोठ्याने ओरडला आणि मीच आहे तो माणूस असं म्हणाला. त्यानंतर त्याची पुन्हा फिरोज खानसोबत भेट झाली आणि त्याला ‘कुर्बानी’ चित्रपटात पहिली मुख्य भूमिका मिळाली.