‘शक्तिमान’ ही भारतातील पहिली सुपरहिरो मालिका म्हणून ओळखली जाते. ९०च्या दशकात ही मालिका तुफान लोकप्रिय होती. ‘शक्तिमान’च्या लोकप्रियतेमागे पत्रकार गीता विश्वास या व्यक्तिरेखेचा सिंहाचा वाटा होता. पटकथेनुसार तिनेच ‘शक्तिमान’ला सुपरहिरो म्हणून प्रसिद्ध केलं होतं. ही व्यक्तिरेखा सुरुवातीला अभिनेत्री किटू गिडवाणी हिने साकारली होती. परंतु काही भागांनंतर तिच्या ऐवजी मालिकेत वैष्णवी दिसू लागली. या बदलामागे खरं कारण काय होतं? किटू गिडवाणीला ‘शक्तिमान’मधून का काढण्यात आलं? मुकेश खन्ना यांनी सांगितली किटूसोबत घडलेली ती इनसाइड स्टोरी…

अवश्य पाहा – अमिताभ-कनिका व्यतिरिक्त ‘या’ कलाकारांना झाली करोनाची लागण

अवश्य पाहा – सलमानचं ‘सल्लू’ हे नाव कोणी ठेवलं?; भाईजानने सांगितला आपल्या नावाचा अजब किस्सा

मुकेश खन्ना यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट करुन किटू गिडवाणीला ‘शक्तिमान’मधून बाहेर करण्यामागचं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले, “कित्येक वर्ष आम्ही ही गोष्ट दाबून ठेवली होती. परंतु आता चाहत्यांना खरं कारण सांगण्याची वेळ आली आहे. किटू एक उत्तम अभिनेत्री होती. गीता विश्वास ही व्यक्तीरेखा तिने उत्तम पद्धतीने साकारली होती. परंतु काही दिवसांनंतर तिने शूटिंगमध्ये गैरहरजर राहण्यास सुरुवात केली. ती न सांगता दांड्या मारायची. त्यावेळी किटूने काही फ्रेंच चित्रपटांना देखील साईन केलं होतं. आम्हाला असं जाणवलं की ती गांभिर्याने काम करत नव्हती. अखेर तिच्या वर्तुणूकीला कंटाळून आम्ही तिला ‘शक्तिमान’मधून काढून टाकलं.” मुकेश खन्ना यांचा हा व्हिडीओ सध्या शक्तिमानच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

किटू गिडवाणी ९०च्या दशकातील एक नामांकित अभिनेत्री आहे. ‘होली’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘खोज’, ‘ब्लॅक’, ‘तेहकिकात’, ‘जुनून’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये ती झळकली. ‘घोस्ट स्टोरिज’, ‘ओके जानू’, ‘धोबी घाट’, ‘जाने तू या जाने ना’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.