नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान.’ त्यावेळी शक्तिमान या पहिल्या भारतीय सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर जादू केली होती. अनेक लहान मुलांनीही तशी कृती करण्याचा प्रयन्त केला होता. त्यामुळे ही मालिका चर्चेत आली होती. पण सध्या सोशल मीडियावर शक्तिमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी शक्तिमानला CAA आणि NRC सोबत जोडले आहे.

शक्तिमान हा त्यावेळी भारतीय सुपरहीरो होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शक्तिमानला बँकेमधून चोरी करुन पळून जाणाऱ्या चोरांना पकडताना दिसतो. त्या चोरांना पकडून त्यांच्या कडून लूटलेले पैसे शक्तिमान घेतो. तितक्यात पोलिस तेथे येतात आणि शक्तिमानकडून चोरांनी लूटलेले पैसे घेऊन त्यांना परत करतात. त्यानंतर ते पोलिस शक्तिमानची चौकशी करु लागतात. तुझ्याकडे वाहन परवाना आहे का? हवेत उडण्याची परवानगी देणारे कादगपत्र आहेत का?, जन्माचा दाखला तसेच शाळेचा सोडल्याचा दाखल आहे का? असे अनेक प्रश्न पोलिस शक्तिमानला विचारतात. अल्ट्रा किड्स झोनने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी २२ वर्षांपूर्वी शक्तिमानला CAA आणि NRC ची भनक लागली असल्याचे म्हटले आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यात (CAA) नेमके काय?
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे.

कोणत्या अटींमध्ये करण्यात आलेत बदल?

सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी ११ वर्ष राहणे आवश्यक आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यामध्ये ही अट शिथिल करून ती सहा वर्ष करण्यात आली आहे. यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा-१९५५ मध्ये बदल करण्यात आले आहेत.