07 August 2020

News Flash

चित्ररंजन : मानवी संगणकाची माणूसकथा

बंगलोरमधील छोटय़ाशा खेडय़ातील लहानग्या शकुंतलाला सहजी मोठमोठी आकडेवारी करता येते हे तिच्या वडिलांच्या ध्यानात येतं.

संग्रहित छायाचित्र

 

रेश्मा राईकवार

चरित्रपट साकारताना ती व्यक्ती प्रतिभावंत का ठरली, याचा शोध घेणं जितकं गरजेचं असतं तितकं च किंबहुना माणूस म्हणून त्याची झालेली जडणघडण समजून घेणं त्यापेक्षा जास्त गरजेचं असतं. ‘मानवी संगणक’ म्हणून गौरवल्या गेलेल्या शकुंतला देवी यांची कथा सांगताना दोन्ही सूत्रं सांभाळत गणित यशस्वी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनू मेनन यांनी केला आहे. या चित्रपटात शकुंतला यांचा गणितज्ञ म्हणून झालेल्या प्रवासापेक्षा माणूस म्हणून त्यांच्यातील गुण-दोष, भावनिक गुंतागुंतीचे सूत्र अधिकीचे झाले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या समीकरणाचा तोल काहीसा बिघडलेला वाटतो. हा तोल विद्या बालनच्या सहज अभिनयाने सावरला आहे.

बंगलोरमधील छोटय़ाशा खेडय़ातील लहानग्या शकुंतलाला सहजी मोठमोठी आकडेवारी करता येते हे तिच्या वडिलांच्या ध्यानात येतं. एरव्ही अशी देणगी दैवी लाभलेल्या मुलामुलींना शिक्षणाची कवाडं खुली होतात. त्यांना चांगल्या आयुष्याची दारंही खुली होतात, ही आपली सहज भावना. प्रत्यक्षात या दैवी देणगीमुळे शकुंतलेला शिक्षणाची दारं खुली झाली नाहीतच, उलट तिच्या वडिलांनी त्याचाही खेळ मांडला आणि त्यातून पैसे कमवायला सुरुवात के ली. जबरदस्तीने सुरू झालेला हा वेगवेगळ्या गावांतला गणिताचा खेळ शकुंतला देवींना एक वेगळेच माणूस म्हणून घडवून गेला. बहिणीला उपचार देण्यासाठी न झगडता के वळ पैशासाठी तिच्या हुशारीचा वापर करून घेणारा बाप, निदान आपल्या मुलींसाठी का होईना आईने वडिलांना जाब विचारावा, ही छोटय़ा शकुंतलेची इच्छा.. पण दर वेळी तिच्या पदरी निराशाच येते. या सगळ्याबद्दल कमालीचा तिरस्कार बाळगत मोठी झालेली शकुंतला खऱ्या अर्थाने परफॉर्मर होते. गावागावांतून गणिताचा खेळ रंगवणारी शकुंतला एका क्षणी सगळं सोडून इंग्लंडला ताराबाईच्या लॉजवर येऊन धडकते. मोडकं तोडकं  इंग्रजी, रीतसर शिक्षण नाही; पण उपजत हुशारी, गणिती कौशल्य आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या जोरावर दोन वेण्या आणि साडीत दूरदेशात गणिताचा खेळ रंगवणारी शकुंतला ते मानवी संगणक म्हणून लौकिक मिळवलेल्या शकुंतला देवी हा प्रवास त्यांनी एकटय़ाने के ला. घरच्यांचा आधार नसताना, परदेशात कोणीही ओळखीचं नसताना आपली ओळख निर्माण करणं, तेही पन्नासच्या दशकात ही कोणत्याही भारतीय स्त्रीसाठी सोपी गोष्ट नव्हती. त्यांचा हा सगळा प्रवास विस्मयकारक आहे. या प्रवासात त्यांच्या आयुष्यात आलेले पुरुष आणि गरज म्हणून नव्हे तर प्रेम जपणारं नातं शोधणाऱ्या शकुंतला देवी पाहताना त्यांच्या प्रत्येक विचारात असलेली सुस्पष्टता आणि आपले निर्णय चूक की बरोबर या द्वंद्वात न अडकता आपल्याला हवे तसे आयुष्य आपल्या अटी-शर्तीवर जगण्याचे धाडस असलेली ही स्त्री आपल्याला पुन:पुन्हा थक्क करते.

शकुंतला देवींचा हा चित्रपटातील प्रवास एका टप्प्यावर मात्र वैयक्तिक संघर्षांकडे वळतो. आई आणि मुलीतला संघर्ष, पती-पत्नींमधली वैचारिक तफावत आणि या सगळ्यातूनही आपल्या मुलीला सर्वोत्तम घडवण्याचा ध्यास बाळगणारी आई.. हा टप्पा उलगडताना ही गोष्ट त्यांची मुलगी अनुपमा यांच्या दृष्टिकोनातून जास्त उलगडत जाते. त्यामुळे शकुंतला देवी यांनी नंतरच्या काळात केलेलं लिखाण, समलिंगींवर प्रकाश टाकणारं त्यांनी लिहिलेलं पुस्तक या गोष्टी तोंडी लावण्यापुरत्या येतात. त्या काळात पुस्तकाच्या माध्यमातून हा विषय पोहोचावा म्हणून स्वत:चा नवराच समलिंगी असल्याबद्दल केलेलं खोटं विधान या घटनांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंत अधिक समोर येते. हळूहळू मुलीच्या कथेनुसार तिचा बदलत गेलेला दृष्टिकोन आणि त्या अनुषंगाने शकुंतला देवी यांनी घेतलेल्या निर्णयामागची कारणमीमांसा ही तर्कसंगती सहज लक्षात येत नाही. हा वैयक्तिक आई-मुलीमधला भावनिक संघर्ष उत्तरार्धात अधिक रंगवला गेला असल्याने ‘गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये विक्रम नोंदवणाऱ्या शकुंतला देवी यांच्यातील गणितज्ञ, आकडय़ांशी त्यांची असलेली मैत्री आणि त्यातून त्यांनी मुलांवर के लेली जादू या गोष्टी फारशा विस्ताराने येत नाहीत. एका अर्थी हा संपूर्ण चित्रपट शकुंतला देवींची भूमिका अगदी सहजतेने आणि आत्मविश्वासाने रंगवणाऱ्या अभिनेत्री विद्या बालनचा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सान्या मल्होत्रा, अमित साध, शकुंतला देवींचे पती परितोष यांची भूमिका साकारणारा बंगाली अभिनेता जिशू सेनगुप्ता अशी सगळीच कलाकार मंडळी उत्तम आहेत. मात्र पडद्यावर सगळ्यात प्रभाव जाणवतो तो विद्याचा.. त्यामुळे एरवी हा चित्रपट शकुंतला देवींचा साधा सरळ आयुष्यपट वाटला असता, पण विद्या बालन यांनी ताकदीनिशी वेगवेगळ्या कंगोऱ्यांसह शकुंतला देवी उभी के ली आहे. काहीशा वेगळ्याच मुशीत घडलेल्या शकुंतला देवींसारख्या कर्तबगार स्त्रीची कथा या चित्रपटाने पडद्यावर आणली आहे हेही नसे थोडके !

शकुंतला देवी

दिग्दर्शक – अनू मेनन

कलाकार – विद्या बालन, जिशू सेनगुप्ता, सान्या मल्होत्रा, अमित साध, प्रकाश बेलवडी, शीबा चढ्ढा, नील भूपालम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:11 am

Web Title: shakuntala devi movie review abn 97
Next Stories
1 विचित्र योगायोग
2 ओटीटीची साहित्यवाट
3 “बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील माहित नव्हतं”; रोहित पवार यांचा उपरोधिक टोला
Just Now!
X