18 January 2019

News Flash

आराध्याला ओठांवर किस करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे ऐश्वर्यावर शेलक्या शब्दांत टीका

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केलेल्या या कमेंट पाहून पुन्हा एकदा बदलत्या मानसिकतेविषयी अनेकांनीच नाराजीही व्यक्त केली आहे

आपल्या सौंदर्याने असंख्य चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामच्या दुनियेत पदार्पण करणाऱ्या ऐश्वर्याचं चाहत्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. इतकच काय तर, या अकाऊंटवरुन कोणतीही पोस्ट करण्यात आलेली नसतानाही तिच्या फॉलोअर्सचा आकडा झपाट्याने वाढला होता. ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले. पण, एक फोटो शेअर करणं तिला महागात पडलं.

‘मदर्स डे’च्या निमित्ताने ऐश्वर्याने आराध्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. कान्सच्या निमित्ताने परदेशात असणाऱ्या ऐश्वर्याने आराध्यासोबतचा हा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती आराध्याला किस करताना दिसत आहे. अतिशय निरागस अशा या फोटोमध्ये अॅश आणि तिच्या लाडक्या लेकीमध्ये असणांरं नि:स्वार्थ नातंही पाहायला मिळालं. पण, आई आणि मुलीच्या या नात्यालाही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. ज्यावर काहींनी तर अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं. पाच, सहा वर्षांच्या मुलीच्या किंवा या वयातील कोणत्याची लहान मुलाच्या ओठांवर किस करणं किती विचित्र आहे, अशी एका युजरने कमेंट केली. तर, कोणी आणखीनच पुढे जात या नात्याविषयी अतिशय हीन शब्दांमध्ये ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केलेल्या या कमेंट पाहून पुन्हा एकदा बदलत्या मानसिकतेविषयी अनेकांनीच नाराजीही व्यक्त केली आहे. आई आणि मुलीच्या नात्याविषयी कोणी इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसं व्यक्त होऊ शकतं हाच प्रश्न वारंवार अनेकांच्या मनात घर करत आहे. त्याशिवाय काळ आणि हे जग पुढे जात असलं तरीही नैतिक मुल्यांचा सर्वांनाच विसर पडत असल्याची भावना मन विषण्ण करुन जात आहे. ऐश्वर्याने पोस्ट केलेल्या या फोटोवरील कमेंट्समुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले असून शेलक्या शब्दांमध्ये कमेंट करणाऱ्यांना इतर नेटकऱ्यांनी धारेवर धरत त्यांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरीही ही वेळ येतेच कशी आणि निदान अशा नात्यांकडे घाणेरड्या दृष्टीने पाहण्याचं धाडसच कोण कसं करतं हाच प्रश्न खिन्न करत आहे.

First Published on May 17, 2018 3:54 pm

Web Title: shame on those trolling aishwarya rai bachchan for kissing daughter aaradhya