चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीबद्दल अनेकदा चर्चा होते. गॉडफादर किंवा कौटुंबिक पाठबळ असल्याशिवाय या क्षेत्रात टिकाव धरणे कठीण असते. मात्र, अनेकदा याउलट चित्र समोर येतं. कुटुंबातील एखादी व्यक्ती सुपरस्टार असली तरी त्याच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला चित्रपटसृष्टीत यश मिळेलच असं होत नाही. अभिनेत्री शमिता शेट्टीसोबतही हेच झालं आहे. शमिताची बहिण शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये बरंच नाव कमावलं. तिची यशस्वी घोडदौड विविध रिअॅलिटी शोजच्या माध्यमातून अजूनही सुरूच आहे. मात्र, ‘मोहब्बते’सारख्या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण केलेली तिची बहिण शमिता आता चित्रपटसृष्टीपासून दूर जाऊन बराच काळ उलटला आहे.

२००० मध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘मोहब्बते’ या चित्रपटातून शमिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर तिला बऱ्याच ऑफर्सदेखील मिळाल्या. पण, उत्तम अभिनेत्री म्हणून ती स्वत:ला सिद्ध करू शकली नाही. चित्रपटांपासून दूर गेलेल्या शमिताने आता वेब सीरिजकडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘यो के हुआ ब्रो’ या वेब सीरिजमधून ती अभिनय क्षेत्रात पुनरागमन करतेय.

शमिताच्या मते तिने अभिनय करायचे सोडून दिलं असं समजून अनेकांनी तिला चित्रपटांच्या ऑफर्स देणंही सोडून दिलं. त्यावेळी अभिनयाव्यतिरिक्त तिला इतर काही गोष्टींमध्ये तिला रस होता. इंटिरियर डिझायनिंगची आवड असल्याने त्यासाठी ती जास्त वेळ देऊ लागली. अनेक ऑफर्सना त्यावेळी नकार दिल्याचा पश्चातापही तिला होत आहे. शिल्पाने ज्याप्रकारे यश मिळवलं तेवढं यश आपल्याला मिळाले नसल्याची खंत असली तरी माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केले, असे तिने सांगितले.

शमिता आता जवळपास ९ वर्षांनंतर अभिनय करणार आहे. वेब सीरिजच्या शुटिंगवेळी दिग्दर्शकांकडून अनेकदा सल्लामसलत करूनच काम करत असल्याचं तिने सांगितलं. हा अनुभव पहिल्या चित्रपटासाठी शुटिंग करतानाच्या अनुभवासारखाच आहे, असं ती म्हणाली.