शंकर महादेवन, एहसान नूरानी आणि लॉय मेंडोंसा बॉलिवूडचे दिग्गज संगीत दिग्दर्शकांपैकी एक. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करावे की नाही यावरुन बॉलिवूडमध्ये दोन गट पडले. काहींना पाकिस्तान कलाकारांवरची बंदी योग्यच वाटत होती तर काहींच्या मते हा कलाकारांवर होणारा अन्याय आहे असे वाटत होते. या तिघांनी मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला. पण आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिली. शंकर म्हणाले की, ‘सध्याचे वातावरण पाहता मी याबद्दल काहीही बोलणार नाही. पण आता मी फक्त भारतीय कलाकारांबरोबच काम करु इच्छितो.’ शंकर महादेवन यांच्या या वक्तव्यावर एहसान आणि लॉय यांनीही संमती दर्शवली.

मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. गायक अभिजीत भट्टाचार्य, अभिनेता अजय देवगण, नाना पाटेकर,  साजिद खान यांनी आपली मतं यावर मांडली होती. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी या प्रश्नाचे उत्तर द्यायला नकार दिला. या प्रश्नासाठी ही योग्य वेळ नाही असे ते यावेळी म्हणाले.

‘पार्च्ड’ची अभिनेत्री राधिका आपटेने पाकिस्तानी कलाकारांचे यावेळी समर्थन केले. तिच्या मते, पाकिस्तानी कलाकारांनाही भारतात येऊन सिनेमे करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांच्यावर बंदी घालणं अयोग्य आहे. सलमान खाननेही पाकिस्तान कलाकारांचे समर्थन केले होते. हे कलाकार अधिकृत व्हिसा घेऊन आणि काम करण्याचा परवाना घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे अन्यायकारक आहे. ते एक कलाकार आहेत कोणी दहशतवादी नाही.