‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र ही भूमिका साकारताना खांद्यावर एक जबाबदारी टाकण्यात आल्याची भावना शरदने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी बोलताना व्यक्त केली. इतकचं नाही तर ही भूमिका साकारण्यासाठी आणि यामधून वाद निर्माण होऊ नये म्हणून कशी काळजी घेतली याबद्दलही त्याने माहिती दिली.
“तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहात. ही खूप मोठी जबाबदारी आहे. चुकूनही चूक झाली तरी त्याचे मोठे परिणाम होती. त्यामुळेच या चित्रपटामुळे वाद निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेतली आहे,” असा प्रश्न एका महिला पत्रकाराने शरदला विचारला. “चूकूनही चूक व्हायला नको ही काळजी आम्ही घेतली आहे,” असं उत्तर शरद यांनी दिले. त्यानंतर पुढे बोलताना, “जेव्हा तुम्ही असं एखादी भूमिका साकारत असता त्यावेळी खूप काळजी घेणे गरजेचं असतं कारण तुमच्याकडे दुसरा काही पर्याय उपलब्ध नसतो. मी दिग्दर्शक ओम यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अभिनय करताना अंमलात आणली आहे. अशी भूमिका साकारताना डोळ्यांचा एक इशारा इकडचा तिकडे झाला तरी चूक होऊ शकते. इतका सूक्ष्म अभ्यास आम्ही केला होता. त्यानुसारच अभिनय करताना काय करावं आणि काय नाही हे मला आधीच सांगण्यात आलं होतं,” अशी माहिती शरदने दिली.
आणखी वाचा- ‘इतक्या वर्षांनी काजोलसोबत काम करताना कसं वाटलं?’; अजय देवगणने दिले ‘हे’ मजेशीर उत्तर
शरदबरोबरच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माता आणि प्रमुख अभिनेता असणाऱ्या अजय देवगणनेही “या चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली आहे,” असं स्पष्ट केलं आहे. “चित्रपटातील सर्व संदर्भ ऐतिहासिक असून यावर आम्ही बराच अभ्यास केला आहे. कोणाच्याही भावना दुखवाल्या जाणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे,” असं एका प्रश्नाला उत्तर देताना अजय म्हणाला. मात्र असं असूनही चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
First Published on November 20, 2019 5:09 pm