‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असे विधान अभिनेते आणि मक्क्ल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी केले. या विधानावरून मोठे वादंग उठले असून आता अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा कमल हासन यांचा निषेध केला आहे. शरद पोंक्षेंनी फेसबुकवर पोस्ट लिहित कमल हासन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

शरद पोंक्षेंनी लिहिलेली पोस्ट-
‘दहशतवादाला धर्म नसतो. अगदीच मान्य. पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लिम असतो हे जगातलं वास्तव. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी. इतिहास साक्ष आहे की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणं केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कुठे राहत असतील तर ते हिन्दुस्थानात आणि हे कित्येक मुसलमानांचं मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा उल्लेख करतोय तेही जाहिरपणे आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा.’

‘आता नथूराम गोडसे ह्याने गांधीचा खून केला. ह्यावर चूक बरोबर ह्यावर लाखो मत मांडली गेली. चर्चा झाल्या. पण म्हणून सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवलं जातंय. हे वक्तव्य करणाऱ्या कमल हासनचा मी तीव्र विरोध निषेध करतो. आपल्याला पटल तर तुम्हीही करा. हा कोणा पक्षाचा अपमान नाही. हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान आहे. ता.क. तथाकथित पुरोगामींनीही निषेध करायला हरकत नाही.’

दुसरीकडे भाजपच्या विविध नेत्यांनी कमल हासन यांच्यावर टीका केली आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. त्यामुळे हासन यांचे विधान विशिष्ट धर्माला लक्ष्य करणारे आहे. त्यामुळे त्याचा निषेधच करायला हवा, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.