बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सीरिजचे निर्माते आणि कलाकारांना कुठलाही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सीरिज विरोधाता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता यावर सैफ अली खानची आई अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वक्तव्य केले आहे.

‘तांडव’ या सीरिजवरुन सुरु असलेल्या वादामुळे शर्मिला यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम झाला आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, शर्मिला टागोर यांनी ‘तांडव’ वेब सीरिजवरुन सुरु असलेल्या वादावरुन सैफला सल्ला दिला आहे. यापुढे कोणताही प्रोजेक्ट साइन करण्यापूर्वी स्क्रीप्ट अत्यंत काळजीपूर्वक वाचून घे असे शर्मिला सैफला म्हणाल्या आहेत. त्यांना करीनाची चिंता देखील सतावत आहे. करीना लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे या आनंदाच्या वेळी कुटुंबातील कोणताही सदस्याला अडचणींचा सामना करावा लागणार नाही ना अशी चिंता शर्मिला यांना सतावत आहे.

शर्मिला यांनी सैफला कोणताही प्रोजेक्ट साइन करण्यापूर्वी स्क्रीप्ट वाचण्याचा सल्ला दिला आहे. तसेच एखाद्या विषयावर मत मांडताना विचार करायला हवा असे देखील त्यांनी म्हटले आहे.

‘तांडव’ वेब सीरिजच्या एका दृश्यामध्ये मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. या सीरिजद्वारे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला गेला. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केला.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.