हॉलीवूडमधील सर्वात मादक अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी शेरॉन स्टोन नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमुळे फार चर्चेत आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेली ही मुलाखत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून ४० लाखांपेक्षा जास्त लोकांनी ही मुलाखत पाहिली आहे. सिनेकारकिर्दीतील ४० वर्षांत शेरॉनने अनुभवलेले गमतीदार प्रसंग जाणून घेण्यासाठी या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. गमतीदार प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू असतानाच तिला आपल्या लांबलचक कारकिर्दीत कधी कास्टिंग काउचसारख्या गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती काही सेकंद हसली आणि त्यानंतर तिने दिलेल्या उत्तरामुळेच या मुलाखतीचा व्हिडीओ इतक्या मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तिने अनेक निर्माता व दिग्दर्शकांबरोबर तडजोड केली. तिच्या मते सिनेक्षेत्रात काम मिळवण्यासाठी फक्त कौशल्य असून भागत नाही तर त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची तयारी असावी लागते. आज अनेक मोठमोठय़ा अभिनेत्री महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत आहेत. हा क्रांतिकारी विचार तिच्याही मनात डोकावला होता, परंतु ज्या काळात तिने आपली कारकीर्द सुरू केली, ती वेळ महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतकी भीषण होती की विरोध करण्याचे मानसिक धैर्य तिच्यात कधी आलेच नाही. शिवाय ज्या अभिनेत्रींनी आवाज उठवला त्यांना केवळ वृत्तमाध्यमांच्या मथळ्यांवर जागा मिळाली. पुढे त्यांना अभिनय क्षेत्रातून कायमचे वगळण्यात आले.

शेरॉनच्या म्हणण्याप्रमाणे तिने शक्य तितका विरोध केला, परंतु काही ठिकाणी तिला तडजोड करणे भाग पडलेच. आयुष्यात यश मिळवण्यासाठी अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागतो. आणि आजवर तिने सोसलेले अत्याचार ती याच संघर्षांचा एक भाग समजते. आणि म्हणूनच गेली ४० र्वष ती सिनेक्षेत्रात कार्यरत राहू शकली, असे तिला वाटते.