छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सध्या शशांकने केलेली एक पोस्ट चर्चेत असून व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘आता शिव्या खायला तयार रहावं लागणार’ असे म्हटले आहे. शशांकला कोणाच्या शिव्या खायला लागणार आणि का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. शशांकने याच पोस्टमध्ये चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

शशांक लवकरच एक नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘पाहिले न मी तुला’ असे असून १ मार्च पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत शशांक एकदम हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. तो पहिल्यांदाच एका निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षक कसे स्वीकारणार याबाबत शशांक जरा साशंक आहे. म्हणून त्याने मालिकेचा प्रोमो शेअर करत ‘शिव्या खायला तयार रहावं लागणार’ असे म्हटले आहे.

शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पाहिले न मी तुला’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्याने ‘माझ्या मते मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे मला. एक अभिनेता म्हणून टेलिव्हिजनवर फार कमी वेळा असे प्रयोग करायला मिळतात’ असे त्याने म्हटले आहे. पुढे त्याने अशी खतरनाक संधी दिल्याबद्दल झी, कोठारे व्हिजन, आदित्य कोठारे, उर्मिला कोठारे यांचे आभार मानले आहेत.