सोशल मीडियावर कधी कोणती पोस्ट व्हायरल होईल याचा नेम नसतो. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमधील पिशव्या विकणाऱ्या आजोबांची सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. हे आजोबा डोंबिवलीमधील गावदेवी मंदिराजवळ बसून पिशव्या विकतात. या आजोबांकडून दोन पिशव्या विकत घ्याव्या अशी इच्छा व्यक्त करणारी पोस्ट अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियवर शेअर केली होती. पण त्याच्याकडे या आजोबांची पूर्ण माहिती नसल्याचे देखील त्याने म्हटले होते. आता शशांकने त्या डोबिंबलीमधील आजोबांचा पत्ता शोधून काढला असून त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली आहे.

शशांकने या जोशी आजोबांची भेट घेतल्यावर त्या दाम्पत्याचा थक्क करणारा प्रवास समोर आला. नुकताच शशांकने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट डोंबिवलीमधील जोशी आजोबांची आहे. ‘सकाळी सकाळी हा फोटो बघून भरुन आलं.. वाईट वाटलं, आनंद झाला, राग आला पण सरते शेवटी या जगात आपण आलो आहोत तर जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी काहीतरी काम करत राहण्याशिवाय पर्याय नाही हेही realise झालं. माहिती चा पाठपुरावा केला नाहीये पण तरीही share करतो आहे’ असे त्याने पोस्टमध्ये लिहिले होते.

‘हे जोशी आजोबा, वय वर्ष 87, हे आजोबा गाद्यांच्या दुकानातून पडदा, सोफा यांच्या कव्हरचे उरलेले तुकडे दुकानदारांकडून विकत घेऊन कापडी पिशव्या स्वतः घरीच शिवतात. उदरनिर्वाहासाठी याही वयात त्यांना हे करावे लागते…. 40 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आजोबांकडे पिशव्या आहेत. आजोबा दर सोमवारी डोंबिवलीच्या गावदेवी मंदिरासमोर आणि गुरुवारी फडके रोड वर बसतात …..ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून एक/दोन पिशव्या तरी जरूर घ्या….’ असे शशांकने पुढे लिहित त्या आजोबांना मदत करण्याची अपिल डोंबिवली करांना केली आहे.

जोशी आजोबांची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यावर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आणि आजोबांची माहिती दिली. त्यांची माहिती मिळताच मी लगेच त्या आजोबांची भेट घेतली. दरम्यान आजोबांनी त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असल्याचे सांगितले. पण हातपाय मोकळे रहावे आणि माझ्या आनंदासाठी हे सर्व करत असल्याचं आजोबांनी सांगितले.