कलाविश्व आणि हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधील या अभिनेत्याच्या निधनाने केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही दुःख व्यक्त करत शशी हे एक अद्वितीय अभिनेते होते असे म्हटले. तसेच, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समांतर चित्रपटांमध्ये यशस्वी योगदान दिल्याचेही त्यांनी म्हटले. सोनिया यांनी १९६६ मध्ये आलेला शशी कपूर यांचा पहिलाच चित्रपट ‘शेक्सपियरवाला’ही पाहिला होता.

वाचा : पाकिस्तानमध्येही शशी कपूर यांना वाहिली श्रद्धांजली

सोनिया यांनी कपूर कुटुंबाला पत्र लिहून त्यांच्या भावनांना वाट दिली. यावेळी त्यांनी त्यांचे पती राजीव गांधी यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यांनी लिहिलं की, ‘मला वाटतं १९६६ मध्ये मी इंग्लंडमध्ये होते. शशी यांचे अभिनय कौशल्य, त्यांचे सौंदर्य आणि विशेष म्हणजे राजीव मला तो चित्रपट बघण्यासाठी घेऊन गेले होते. त्यामुळे माझ्यासाठी हा अप्रतिम अनुभव होता.’

शशी यांची मुलगी संजना कपूर यांना लिहिलेल्या पत्रात सोनिया म्हणाल्या की, ‘तुमचे वडील आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते. लोकांच्या मनात त्यांचे स्थान कायम राहील. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरणं कठीण आहे.’ याचसह त्यांनी शशी यांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता प्रार्थनाही केली.

वाचा : चीनमध्ये या मजेशीर नावाने प्रदर्शित होणार ‘बजरंगी भाईजान’

दिग्गज अभिनेते- निर्माता शशी कपूर यांच्या पार्थिवावर ५ डिसेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास तिरंग्यात गुंडाळण्यात आले होते. तसेच, बंदुकीतून आकाशात तीन फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. अमिताभ बच्चन, सलीम खान, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अनिल कपूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर, संजय दत्त, रणबीर कपूर, नसिरुद्दीन शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुप्रिया पाठक, शक्ती कपूर आणि सुरेश ऑबेराय आदि कलाकार दिग्गज अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते.