राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारी भजनं, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी १८१८ सालच्या एका नाण्याचा फोटो ट्विट करुन देशवासीयांना शुभेच्या दिल्या आहेत.

“एक अजब योगायोग आहे, १८१८ साली दोन आण्याचं नाणं होतं. या नाण्याच्या एका बाजूवर भगवान श्री राम यांचं चित्र होतं, तर दुसऱ्या बाजूस कमळाचं फूल होतं. असं वाटतय की हे प्रतिक होतं जेव्हा कमळाचं राज्य येईल तेव्हाच अयोध्येत दिपोत्सव साजरा केला जाईल. भगवान श्री राम यांचं भव्य मंदिर बनेल. जय जय श्री राम.” अशा आशयाचं ट्विट करुन शत्रुघ्न सिन्हा यांनी राम मंदिराचा आनंद व्यक्त केला आहे.

मंदिराचे प्रारूप कसं असेल?

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.