पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. या कठिण काळात रामायण, महाभारत, शक्तिमान अशा दूरदर्शन वाहिनीवरील ८०-९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. दरम्यान एका मुलाखतीमध्ये मुकेश खन्ना यांनी ‘सोनाक्षीसारख्या लोकांनी रामायण ही मालिका पाहावी. त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचे आहे’ असा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला टोमणा मारला. पण आता सोनाक्षीचे वडिल अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी मुकेश खन्ना यांना चांगलेच सुनावले आहे.

शत्रूघ्न सिन्हा यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी सोनाक्षीला पाठिंबा दिला आहे. ‘माझ्या मुलीने रामायणातील प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिल्यामुळे काही लोकं तिच्यावर निशाणा साधत आहेत. पण त्यांना रामायणाचे एक्सपर्ट कोणी बनवले?’ असे शत्रूघ्न यांनी म्हटले.

पुढे शत्रूघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीची प्रशंसा देखील केली आहे. ‘सोनाक्षी ही एक उत्तम मुलगी आहे. मला माझ्या तिन्ही मुलांचा अभिमान आहे. खासकरुन सोनाक्षी तिच्या मेहनतीने स्टार झाली आहे. मला कधी तिला करिअरसाठी मदत करावी लागली नाही’ असे त्यांनी म्हटले.

काय म्हणाले होते मुकेश खन्ना

“रामायण आणि महाभारत या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांनी याआधी ते पाहिलेच नाही. सोनाक्षी सिन्हासारख्या लोकांनी, ज्यांना हनुमान यांनी कोणासाठी संजीवनी आणली हेसुद्धा माहीत नाही, त्यांनी ही मालिका पाहावी” असे मुकेश यांनी म्हटले होते.