नागरिकांच्या रक्षणाचे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने बजावत असताना, काही गुन्हे असे घडतात, की ते उलगडताना पोलिसांच्या चातुर्याची कसोटी लागते. कधीकधी अशा तपासात काही संवेदनशील पैलू समोर येतात आणि गुंता आणखीच वाढत जातो. या आठवड्यात झी युवावर “शौर्य – गाथा अभिमानाची ”  मालिकेत पाहायला मिळणाऱ्या दोन्ही गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. पहिली केस ही महिला पोलीस अधिकारी मीना पाटील यांची आहे.  नाशिकमध्ये एका निर्जन रस्त्यावर मॅकेनिक राजेंद्र जगदाळे नामक व्यक्तीचा खून झाला. पण याचे काहीच धागेदोरे सापडत नव्हते; संशय मात्र त्याच्याच नातेवाईकांवर होता. ही केस ज्या हुशारीने मीना पाटील यांनी सोडवली याची दाद दिली पाहिजे आणि दुसरी कथा म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांची. एक २४ वर्षाची मुलगी सोलापूरहून पहिल्यांदाच मुंबईमध्ये स्वतःच स्वप्न पूर्ण करायला आली होती आणि मुंबईत उतरता क्षणीच तिच्यावर एका तरुणाने अॅसिड हल्ला केला. पोलिसांचा तपास सुरु झाला पण त्या दरम्यान ती मुलगी मेली. मात्र, पोलिसांनी त्यांचे कर्तव्य बजावले आणि त्या क्रूर तरुणाला सोलापूरमधून पुराव्यांसकट शोधून काढले. या दोन्ही कथा शुक्रवार २७ जानेवारी आणि शनिवार २८ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पाहायला मिळतील.

राजेंद्र जगदाळे नाशिकमध्ये एक मॅकेनिक होता. बायको ज्योती आणि मुलगी सुप्रिया हे त्याच कुटुंब. राजेंद्रचा मेहुणा प्रवीण हा एक सक्रिय गुंड होता आणि त्याची बायको मंगला ही त्याला पूर्णपणे साथ देत होती. जेव्हा राजेंद्रचा मृतदेह सापडला तेव्हा पोलिसांना या सर्वच नातेवाईकांचा संशय आला. पण याबाबत पुरावा मिळत नव्हता. महिला पोलीस अधिकारी मीना पाटील या केसची कसून चौकशी करत होत्या. त्यांची टीम प्रत्येकावर पाळत ठेवून होती. शेवटी ठोस पुरावे मिळायला सुरु झाले. ज्योतीचे विवाहबाह्य संबंध होते. मुलगी सुप्रियाचे ३  प्रेम प्रकरणं सुरु होती, तर प्रवीण बरोबर राजेंद्रचे पैशावरून नेहमीच खटके उडत होते. पोलिसांनी कल्पकतेने एक एक पुरावा जमवत कश्याप्रकारे ही केस सोडवली आणि आरोपीपर्यंत मीना पाटील कश्या पोहचल्या हे आपल्याला या शुक्रवारी २७ जानेवारीला रात्री ९ वाजता पहायला मिळेल.

मुंबई बाहेरून हजारोंच्या संख्येने लोक या मायानगरीत आपलं स्वप्न पूर्ण करायला येतात. प्राची जगताप ही त्यातलीच एक. सोलापूरहून नोकरीसाठी मुंबईमध्ये आलेल्या प्राचीला मुंबईत तीच असं स्वागत होईल असं  स्वप्नातही वाटलं नसेल. अतिशय हुशार अशी प्राची मुंबईत नोकरीसाठी आली आणि आल्या आल्या एका अज्ञात तरुणाने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. त्यातच तिचा जीव गेला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मात्र हे मनावर घेतले. प्रेमप्रकरण किंवा प्रेमभंग या दिशेने तपास सुरु असताना संशयाची सुई तिच्या तुटलेल्या लग्नातील नवऱ्यावर होती. पण तो मात्र निरपराधी निघाला. तिच्यावर अॅसिड हल्ला का झाला याबद्दल काहीच पुरावा मिळत नव्हता. पण एके दिवशी पोलिसांच्या हाती अशी एक गोष्ट मिळाली ज्यामुळे अपराधी हा सोलापूरचाच आहे हे स्पष्ट झाले पण कोण हे कळले नव्हते. शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी एक युक्ती केली आणि प्राचीच्या तेराव्याच्या दिवशी पोलिसांना क्रूर गुन्हेगार सोलापूरमध्येच गवसला. ही थरारक गोष्ट शनिवारी २८ जानेवारीला तुम्हाला पहायला मिळेल.