26 September 2020

News Flash

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहिरी जलसा

माणसाने कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्माला यावं हे आपण ठरवू शकत नाही. परंतु, जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर एका विशिष्ट वयात तो आपली भूमिका ठरवून करू शकतो.

| April 12, 2015 12:33 pm

माणसाने कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्माला यावं हे आपण ठरवू शकत नाही. परंतु, जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर एका विशिष्ट वयात तो आपली भूमिका ठरवून करू शकतो. विशेषत: कलावंतांनी आपण कुणाच्या बाजूने आहोत हे स्पष्ट करणं गरजेचं आहे, असं स्पष्ट मत लोकशाहीर संभाजी भगत यांनी मांडलं.
झू एन्टरटेन्मेट प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या व सतरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारावर सुवर्णकमळाची मोहोर उमटवणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘शाहिरी जलसा’ हा कार्यक्रम नागपूर, पुणे, नाशिकनंतर शुक्रवारी मुंबईतील दामोदर हॉल येथे पार पडला. चित्रपटात गीत, संगीत आणि गायक अशी तिहेरी जबाबदारी पार पाडणारे लोकशाहीर संभाजी भगत यांच्या चमूने हा कार्यक्रम सादर केला. चित्रपटातील गाणी आणि संभाजी भगत यांच्या इतर काही गाण्यांचे सादरीकरणासोबत चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांशी गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. ‘कोर्ट’चे निर्माते विवेक गोम्बर आणि दिग्दर्शक चतन्य ताम्हाणे प्रमाणेच या चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञांची टिमही नवखी आहे. या चित्रपटात एका लोककलाकाराचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. शाहिरी करून आपली कलेची भूक भागवणाऱ्या या कलाकाराला त्याने न केलेल्या चुकीसाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या त्या कलाकाराला त्यानंतर काय काय भोगावं लागतं याचं वास्तववादी चित्र ‘कोर्ट’मध्ये उभं करण्यात आलं आहे. त्यामुळे हा केवळ फेस्टिव्हलचा चित्रपट नसून जीवनाचा वेगळा अनुभव देणारा चित्रपट आहे, असं चतन्य यावेळी म्हणाला. आमच्याकडे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पसे नाहीत. परंतु, ज्या सामांन्यांची कथा मांडणारा हा चित्रपट आहे, त्यांच्यापर्यंत तो पोहचण्याचा प्रयत्न ‘शाहिरी जलसा’च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. हा चित्रपट यशस्वी झाला तर यापुढेही असे वेगळ्या विषयावरचे चित्रपट येतील आणि वेगळे प्रयोग होतील, त्यामुळे चित्रपटाला यशस्वी करण्याची जबाबदारी आता प्रेक्षकांवर आहे, असं तो म्हणाला.
आम्ही येथे तुमचं मनोरंजन करणार नाही आहोत तर तुम्हाला अस्वस्थ करणार आहोत, असं संभाजी भगत यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जाहीर केलं. आम्ही केवळ गाणी गात नाही तर आम्ही विचार मांडतो, असं शाहिरी थाटात भगत म्हणाले. ग्लोबल गोंधळ आणि लोकल संबळ, उठवू सारं रान रं, इनकी सुरत को पहचानो भाई, माझ्याच मढय़ावरती आज अश्रू ढाळतो मी यांसारखी एकाहून एक सरस गाणी सादर करत समाजातील आजचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी शिरीष पवार, बाबासाहेब आटखिळे आणि प्रवीण डोणे या युवा शाहिरांच्या साथीने केला. सौंदर्यशास्त्र हे विद्यापीठात शिकवता येत नाही, त्याला जीवनाचा अनुभव लागतो. त्यामुळे त्याची चर्चा समोरासमोर बसून केली पाहिजे, हा विचारही त्यांनी आपल्या निवेदनातून आणि गाण्यांमधून मांडला. जी कला तुम्हाला, सत्याकडे घेऊन जात नाही, ती कला तुमची मुक्ती करूशकत नाही, हे सांगताना  त्यांनी समाजात माजलेल्या बाबा-बुवांच्या प्रस्थावरही चांगलेच तोंडसुख घेतले. आपल्या अंतर्मनात डोकावून पाहा सांगणारे हे भोंदू बाबा, जनतेला समाजात काय चालले आहे त्याकडे कानाडोळा करण्यास सांगतात. कारण त्यामध्ये त्यांचा स्वार्थलपला आहे, असंही ते आपल्या निवेदनात म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 12:33 pm

Web Title: shayari jalsa to promote marathi movie court
टॅग Court
Next Stories
1 ‘कोर्ट’वर पारितोषिकांचा वर्षांव
2 सुपरहिरो चित्रपट मालिकांची निर्मिती अधिक आव्हानात्मक
3 ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ चित्रपटाची १०० कोटींची कमाई
Just Now!
X