असिफ बागवान

सध्या नवरंजन फलाटावर वेबमालिकांचा अक्षरश: लोंढा सुरू आहे. करोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सर्वानाच घरात बसून दिवस ढकलावे लागत आहेत. घरात बसल्या बसल्या काय करायचं, हा प्रश्न अशा परिस्थितीत सतावत असला तरी, अनेकांचं त्यावरचं उत्तर ऑनलाइन स्ट्रिमिंग वाहिन्यांवरील चित्रपट, मालिका हे आहे. त्यामुळे नवरंजन फलाटाकडे प्रेक्षकांचा ओढा वाढला आहे आणि ओटीटी सेवांनीही एकामागून एक नवनवीन वेबमालिका प्रदर्शित करण्याचा धडाका लावला आहे. नेटफ्लिक्सवरून प्रदर्शित झालेली इम्तियाज अलीची ‘शी’ यापैकीच एक. नेटफ्लिक्स, इम्तियाज अली आणि ‘शी’ (अर्थात ती!) असं समीकरण जुळून आलं असेल तर त्याविषयी उत्कंठा वाढणं सहाजिकच आहे. मालिकेचा प्रोमो पाहताना हे ‘हनीट्रॅप’ या विषयाभोवती फिरणारं कथानक असेल, हे जाणवतं. शत्रूच्या गोटातील महत्त्वाची माहिती काढायची असल्यास अथवा एखादी गोपनीय कारवाई करायची असल्यास समोरच्या व्य़क्तीला वासनेच्या जाळय़ात अडकवून आपले इप्सित साध्य करण्याची ही तऱ्हा खूपच जुनी आहे. देशोदेशींच्या गुप्तचर दलांत तर अशा प्रकारच्या ‘हनीट्रॅप’चा वापर तर सामान्य आहे. सैन्यदले किंवा अगदी परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बाबतीतही हे प्रयोग होतातच. त्यामुळे हनीट्रॅप या संकल्पनेवर आधारीत अनेक थरारक चित्रपट, मालिका आपल्या पाहण्यात आले असतीलच. पण ‘शी’ या पठडीत न बसता काहीशी वेगळी वाट निवडतो. मुंबईतल्या एका चाळीत राहणारी भूमिका परदेसी (आदिती पोहनकर) ही रे रोड पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहे. पोलीस ठाण्यातील चहापाण्याच्या बिलांच्या नोंदी करणं किंवा नाकाबंदीदरम्यान एखाद्या कोपऱ्यात उभं राहून वरिष्ठांनी हाक मारण्याची वाट बघणं अशी तिची जबाबदारी. चाळीतील घरात भूमिकासोबत तिची आई आणि लहान बहीण राहतात. पण कुटुंबाची जबाबदारी भूमिकावरच आहे. अशातच मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी जेसन फर्नाडिस (विश्वास किणी) याची नजर तिच्यावर पडते. गुन्हे शाखेच्या एका पथकाला मुंबईत अमली पदार्थाचा मोठा साठा आणण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली असते. या माहितीची पुष्टी करण्यासाठी आणि यामागच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी सस्या (विजय वर्मा) नावाच्या तस्कराला ताब्यात घेण्याची त्यांची योजना असते. सस्याला जाळय़ात अडकवण्यासाठी जेसन भूमिकाची निवड करतो. भूमिकाने ‘कॉलगर्ल’ म्हणून सस्याकडे जायचे आणि त्याला सापळय़ात अडकवायचे, अशी जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात येते. साध्या सरळ भूमिकासाठी ही ‘भूमिका’ अवघड असते. याचं कारण तिच्या भूतकाळात दडलेलं असतं. भूमिका लैंगिकदृष्टय़ा निष्क्रिय असल्याचा ठपका तिच्या पतीनेच तिच्यावर ठेवलेला असतो. यावरून त्या दोघांचा काडीमोडही निश्चित झालेला असतो. अशावेळी सस्याला आपण कसे अडकवणार, हा प्रश्न तिच्या मनात खुपत असतो. पण ‘त्या’ रात्री काहीतरी वेगळंच घडतं. सस्यासोबत शरीरसंबंधाचे नाटक करतानाच भूमिकाला पुरुषांना तिच्याबद्दल प्रचंड लैंगिक आकर्षण असल्याचा शोध लागतो आणि मग तिची विचार करण्याची पद्धतच बदलून जाते.

आजवर नेहमीच कुटुंब, सहकारी, वरिष्ठ यांच्या लेखी दुर्लक्षित राहिलेल्या भूमिकासाठी हा शोध म्हणजे आपलं वर्चस्व दाखवण्याची संधी वाटते. आपलं शरीर हे आपल्याला शक्तिशाली बनवू शकतं, हा विचार तिला कुठे घेऊन जातो, हे ‘शी’च्या कथानकातून उलगडत जातं. कथेचा हा सारांशच तिच्या विषयातील स्फोटकपणा दाखवण्यास पुरेसा आहे. पोलीस दलातील पुरुषी वर्चस्वाखाली वावरणारी भूमिका घरात कुटुंबप्रमुख आहे. पण तिचा मुळचा शांत स्वभाव तिथेही तिला दुय्यम स्थानच देतो. मित्रमैत्रिणी नसल्याने मनातील भावनांचा निचरा करणंही तिला शक्य नाही. अशा परिस्थितीत आपला देह आपल्याला ते सामथ्र्य देऊ शकेल, ही भावना तिच्या अंतर्मनात घट्ट होते. त्यातून जे काही घडतं ते अकल्पित नसलं तरी धक्कादायक निश्चित असतं. आरिफ अली आणि अविनाश दास यांच्या दिग्दर्शनाने बांधली गेलेली ही मालिका आश्चर्याचे धक्के जरूर देते. पण ती ज्या पायावर उभारली गेली, तो पाया पटत नाही. जिद्द, हुशारी, बुद्धिमत्ता इतकंच काय शारीरिक कौशल्य यांच्या बळावर स्त्रिया सर्वच क्षेत्रांत वर्चस्व गाजवत आहेत. अशावेळी भूमिकाचं स्वत:च्या देहाचा वापर त्यासाठी करून घेणं, खटकतं. दुसरं म्हणजे, या कथानकातील अनेक धागे अर्धवट अवस्थेत सोडलेले आहेत. ते शेवटपर्यंत जोडले गेले असते तर, या कथानकाला काही एक अर्थ निर्माण झाला असता. ‘शी’ ही सध्याच्या ठोकळेबाज वेबमालिकांप्रमाणे थरार, रहस्य आणि अंगप्रदर्शन याने भरलेली असल्याने तिच्यात नवं काही सांगण्यासारखं नाही. पण भूमिकाच्या भूमिकेत आदिती पोहनकर आणि सस्याच्या भूमिकेत विजय वर्मा यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीने तिला जिवंतपणा आणला आहे. याआधी दिल दोस्ती ईटीसी किंवा लयभारी या चित्रपटांत झळकलेल्या आदितीने या केंद्रीय भूमिकेत आपल्या अभिनयगुणांचं कौशल्य सिद्ध केलं आहे. विजय वर्मा हा साचेबद्ध भूमिकेतही आपलं वेगळेपण सिद्ध करतो. या दोघांची जुगलबंदी पाहण्यासाठी ‘शी’ पाहायला हरकत नाही.