बॉलिवूडमधील कलाकारांचे असंख्य चाहते असतात. अगदी सामान्य नागरिकांपासून ते मोठ मोठ्या राजकारण्यांपर्यंत या कलाकारांची क्रेझ पाहायला मिळते. बॉलिवूडमधील खान अर्थात शाहरुख, सलमान आणि आमिर यांच्यावर आणि त्यांच्या चित्रपटावर प्रेम करणारे असंख्य चाहते आपण पाहिले असतील, मात्र या साऱ्यांमध्ये दिल्ली काँग्रेसच्या दिवंगत अध्यक्षा शीला दीक्षित अभिनेता शाहरुख खानच्या मोठ्या चाहत्या असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे शीला दीक्षित यांनी शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट असंख्य वेळा पाहिल्याचं सांगण्यात येत आहे.

शनिवारी (२० जुलै) शीला दीक्षित यांचं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. शीला दीक्षित यांच्या निधनामुळे संपूर्ण देशाला एकप्रकारे धक्का बसला असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यातच त्यांच्या मुलीने लतिका दीक्षित सईद यांनी शीला दीक्षित शाहरुखच्या मोठ्या चाहत्या असल्याचं सांगितलं. शीला यांना पुस्तक वाचनाची प्रचंड आवड होती. त्यासोबतच त्यांना शाहरुखचे चित्रपटही आवडत होते. विशेष म्हणजे शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट त्यांनी खुप वेळा पाहिला होता.

“त्या शाहरुखच्या खुप मोठ्या चाहत्या होत्या. त्यांनी शाहरुखचा अभिनय आवडत असल्यामुळे त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ खुप वेळा पाहिला होता. त्या सतत हा चित्रपट पाहत असल्यामुळे अखेर आम्हीच कंटाळलो होतो. शाहरुखव्यतिरिक्त दिलीप कुमार आणि राजेश खन्ना हेदेखील त्यांचे आवडते कलाकार होतो. त्यांना संगीतक्षेत्रातही विशेष आवड होती. खासकरुन रात्री झोपतांना त्या आवर्जुन गाणी ऐकायच्या. विविध क्षेत्रांची आवड जोपासलेल्या शीला या प्रचंड खंबीर होत्या”, असं लतिका यांनी सांगितलं.

दरम्यान, शीला दीक्षित यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभेच्या खासदार होत्या. १९८६ ते १९८९ या कालावधीत शीला दीक्षित यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. शीला दीक्षित यांची २०१४ मध्ये केरळ राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांनी २५ ऑगस्ट २०१४ मध्ये राजीनामा देत काँग्रेसमध्ये पूर्णकाळ कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शीला दीक्षित यांना भाजपाच्या मनोज तिवारीकडून पराभवचा धक्का बसला आहे. १९८४ ते १९८९ या कार्यकाळात शीला दीक्षित यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचं लक्ष वेधलं होतं.